महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:25 AM2022-12-01T10:25:59+5:302022-12-01T10:26:45+5:30
‘तारीख पे तारीख’मुळे होतोय विलंब
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांवरील निकाल लागायला विलंब होत असल्याने मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाणार आहेत.
महापालिकांच्या प्रभागरचनेवरून वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयात १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे; तर मुंबई महापालिकेतील प्रभागांच्या पुनर्रचनेच्या निर्णयाची २० डिसेंबरपर्यंत अंमलबजावणी केली जाणार नाही, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयात १३ डिसेंबर रोजी सुनावणी असून त्या दिवशीच लगेच निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर तीन दिवसांनी लगेच न्यायालयाला नाताळची १५ दिवसांची सुट्टी आहे. त्यामुळे ही याचिका जानेवारीमध्येच सुनावणीस येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने प्रभागरचना नव्याने करण्यास मान्यता दिली तर त्यानंतर प्रभागरचनेचे काम सुरू होऊन ते संपायला आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. जर प्रभागरचना पूर्वीप्रमाणे ठेवण्यास न्यायालयाने मान्यता दिली तरीही निवडणुकीची तयारी पार पाडून निवडणूक जाहीर व्हायलाही विलंब लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.