Join us

'नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकला', भाजप नेत्यांचं निवडणूक आयोगाला लेखी निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 5:11 PM

राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, 18 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार असून 19 ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र, आयोगाच्या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका पुढ ढकलण्यासंदर्भात मागणी केली आहे. ओबीसी आरक्षण आणि पाऊसाचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आज भाजप नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. 

राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न लक्षात घेता नगरपालिका निवडणुका पुढे ढकला, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने देण्यात आल. यावेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर नगरपालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यासाठी, 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणुकीचा कार्यक्रमा जाहीर होणार आहे. त्यामुळे, आाता आयोग काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणुका पुढे ढकल्यासंदर्भातील मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. 

राष्ट्रवादीकडून 27 टक्के आरक्षणाची घोषणा

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे.  

टॅग्स :चंद्रकांत पाटीलनिवडणूकनगर पालिकाभाजपाओबीसी आरक्षण