Join us

महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष होणार अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:13 AM

मुंबई : पूर असो अथवा अतिरेकी हल्ला, मुंबईवर ओढावणाऱ्या प्रत्येक आपत्तीत मदतकार्य तात्काळ पोहोचवण्यात आपत्कालीन नियंत्रण कक्ष महत्त्वाची भूमिका ...

मुंबई : पूर असो अथवा अतिरेकी हल्ला, मुंबईवर ओढावणाऱ्या प्रत्येक आपत्तीत मदतकार्य तात्काळ पोहोचवण्यात आपत्कालीन नियंत्रण कक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे हा कक्ष अद्ययावत करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार बिनतारी संदेशवहन यंत्राऐवजी डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणालीचा वापर यापुढे केला जाणार आहे.

मुंबईत दररोज छोट्यामोठ्या दुर्घटना घडत असतात. आग लागणे, पूरपरिस्थिती, इमारत दुर्घटना अशा घटनांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तात्काळ मदत यंत्रणा पोहोचणे आवश्यक असते. अशा वेळी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम आपत्कालीन नियंत्रण कक्षामार्फत केले जाते. अशा या महत्त्वाच्या कक्षामध्ये अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागात ॲनालॉग बिनतारी प्रणाली २००९ पासून कार्यरत असून या प्रणालीचा १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

ही प्रणाली बदलून आता अत्याधुनिक अशी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल मोबाइल रेडिओ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग डीएमआर प्रणाली असलेले ६५ बिनतारी संच, वाहनांवर बसवण्यासाठी ६० संच, इतर महत्त्वाच्या विभागांना वापरण्यासाठी २०१ वॉकीटॉकी संच, टेलिस्कोपिक अँटेना, पाच रिपिटर संच तसेच प्रोग्रॅमिंग आणि डीसपॅचर खरेदी करणार आहे.

* डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणालीवर १६ कोटी ९६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मे. शितल वायरलेस टेक्नाॅलाॅजीस प्रा.लि. या कंपनीला पाच वर्षांसाठी देखभालीचे कंत्राट देण्यात येणार आहे.

* सन २०१३ ते २०१९ या कालावधीत मुंबईत ३९४५ इमारत दुर्घटनेत ३०० लोकांचा मृत्यू झाला. तर, २०१३ ते २०१८ या सहा वर्षांत विविध ४९ हजार १७९ दुर्घटना घडल्या. त्यामध्ये ९८७ लोकांचा मृत्यू झाला.

* २०१९ मध्ये घर पडणे, इमारत किंवा इमारतीचा भाग कोसळणे, शॉक लागणे, नाल्यात समुद्रात वाहून जाणे, बुडणेे अशा प्रकारच्या ९,९४३ दुर्घटनांमध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला.