वेतनासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:59 AM2019-08-28T00:59:43+5:302019-08-28T00:59:47+5:30
बैठकीतून तोडगा नाहीच : आंदोलनाची दिशा ठरणार
मुंबई : नवीन वेतन करार व विविध मागण्यांसाठी महापालिकेतील कर्मचारी संघटना समन्वय समिती व प्रशासनामध्ये मंगळवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे कामगारांचा मोर्चा बुधवारी आझाद मैदानात धडकणार असून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. परिणामी, ऐन गणेशोत्सव काळात महापालिकेच्या संपाची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे.
बेस्ट कामगारांनी नवीन वेतन करारासाठी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेतील कर्मचारीही आक्रमक झाले आहेत़ वेतन करारासाठी प्रशासनावर दबावतंत्र सुरू करण्यात आले आहे. पालिका कामगारांच्या विविध मागण्यांवर आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या दालनात मंगळवारी चर्चा झाली. या बैठकीत समन्वय समितीचे सर्व नेते, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड, उपायुक्त मिलिन सावंत व सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. प्रशासनाने कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या व त्यावर विचार करण्याची तयारी दाखविली आहे. नवीन वेतन करार होईपर्यंत आता आंदोलन थांबणार नाही, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
बुधवारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटना आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत.
येथेच कामगारांचा मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे कामगार नेते अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.
अशा आहेत प्रमुख मागण्या...
च्सहाव्या वेतन आयोगानुसार कामगारांना लागू असलेली सामूहिक गटविमा योजना १ सप्टेंबर २०१९ पासून पुन्हा सुरू करावी. १ आॅगस्ट २०१७ पासून कामगार-कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराचा खर्च द्यावा.
च्सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीसह सर्व भात्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी वाटाघाटी समितीची स्थापना करावी. लवकरात लवकर करार करण्यात यावा. १ जानेवारी २०१६ पासून सर्व थकबाकी गणेशोत्सवापूर्वी एकरकमी देण्यात यावी.
च्पालिकेच्या सेवेत ५ मे २००८ नंतर लागलेल्या कर्मचाºयांना पूर्वीच्या कामगार-कर्मचाºयांना मिळणारी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करण्यात यावी.
बायोमेट्रिकवर अडणार घोडे
पालिका कामगारांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली. गैरहजर कर्मचारी, अधिकारी यांचे वेतन कापले जात आहे. मात्र सदोष बायोमेट्रिक यंत्रामुळे कामावर असलेल्या कर्मचाºयांचीही गैरहजेरी लागत आहे. दर महिन्याला वेतनाचा घोळ निर्माण होत असल्याने ही हजेरी पद्धतच बंद करण्याची मागणी केली जात आहे. बायोमेट्रिक पद्धत पालिकेत अत्यावश्यक असून ती बंद करण्यास प्रशासन तयार नाही.
बैठकांवर बैठका
महापालिका कामगार संघटनेच्या समन्वय समितीने १२ जुलै २०१९ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाबरोबर चर्चा केली होती. त्यानंतरही नवीन वेतन करार आदी मागण्यांबाबत निर्णय झाला नाही. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीतही वाटाघाटीतून काहीच निष्पन्न झालेले नाही, अशी नाराजी कामगार नेत्यांनी व्यक्त केली आहे.