लस घेण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार तीन संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:08 AM2021-02-17T04:08:28+5:302021-02-17T04:08:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (फ्रंटलाईन वर्कर्स) लस देण्यास सुरुवात करण्यात ...

Municipal employees will get three opportunities to get vaccinated | लस घेण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार तीन संधी

लस घेण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार तीन संधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना (फ्रंटलाईन वर्कर्स) लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पालिका आणि ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनाही डोस दिला जाणार आहे. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या तीन संधी देण्यात येणार आहेत. त्यानंतरही लस घेण्यास हजर न होणाऱ्या त्या कर्मचाऱ्याचे नाव लसीकरणाच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड लसीकरणासाठी स्थापित ‘टास्क फोर्स’ची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला उपायुक्त (आरोग्य) देवीदास क्षीरसागर, संचालक (आरोग्यशिक्षण व प्रमुख रुग्णालये) रमेश भारमल यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी असे निर्देश दिले. सर्व खातेप्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वत: लस घ्यावी व त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असेही त्यांनी यावेळी बजावले. खातेप्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले छायाचित्र आपल्या खात्याचा ‘व्हाॅट्सॲप ग्रुप’ असल्यास त्यावर शेअर करावे; जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल, असेही त्यांनी सुचविले.

* या नियमांचे पालन गरजेचे

- सर्व विभाग स्तरावर लसीकरणासाठी नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभाग / खात्यातील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करावे. कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाजवळील किंवा घराजवळील लसीकरण केंद्रामध्ये डोस देण्याची व्यवस्था करावी.

- कर्मचारी संख्या अधिक असलेल्या खात्यांसाठी स्वतंत्रपणे लसीकरण राबविण्याकरिता संबंधित खात्याच्या विभागप्रमुखांनी व समन्वय अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी.

- एखाद्या खात्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाच वेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करावी.

- गर्भवती, स्तनदा महिला यांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे.

- ज्या कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा झाली होती किंवा झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दिनांकापासून १४ दिवसांनंतर लसीकरण करून घ्यावे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरे लसीकरण करून घ्यावे.

..........................

Web Title: Municipal employees will get three opportunities to get vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.