पालिका कर्मचारी करणार गणेशमूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:09 AM2021-09-10T04:09:03+5:302021-09-10T04:09:03+5:30
मुंबई : कोविड पार्श्वभूमीवर नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे द्याव्यात. कर्मचारी त्या ...
मुंबई : कोविड पार्श्वभूमीवर नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे द्याव्यात. कर्मचारी त्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करतील, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी दिले.
मुंबईतील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांची महापौरांनी पाहणी करून तयारीच्या कामांचा गुरुवारी आढावा घेतला. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. याप्रसंगी उपायुक्त (परिमंडळ-२) हर्षद काळे, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याने महापालिकेने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गिरगाव चौपाटीपासून महापौरांनी पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर दादर चौपाटी, माहीम चौपाटी याठिकाणी महापौरांनी भेट देऊन तेथील तयारी कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. गिरगाव चौपाटी येथे ज्याप्रमाणे विसर्जनासाठी संबंधित मंडळाने विभाग कार्यालयात नोंदणी केल्यानंतर वेळ मिळेल त्या वेळेत मंडळाने विसर्जन करावे. त्याप्रमाणे इतर चौपाट्यांवरही व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
...अशी आहे व्यवस्था
* मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची, तसेच फिरत्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या कृत्रिम तलावांमध्ये जास्तीत जास्त विसर्जन करण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहन महापौरांनी गणेशभक्तांना केले आहे.
* नैसर्गिक चौपाट्या घराजवळ असलेल्या मंडळाने तसेच गणेशभक्तांनी महापालिकेच्या नियमाप्रमाणे आपली गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करावी.
* आपला विसर्जनाचा पाट, तसेच वाळू आपल्याला त्वरित देण्यात येईल, जेणेकरून विसर्जनस्थळ आपल्याला पटकन मोकळे करता येईल, असे महापौरांनी सांगितले.
*गिरगाव चौपाटी येथे दीडशे टेबलची गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.