Join us  

पालिका अभियंत्यांना ‘आॅफिशियल’ स्मार्ट फोन्स

By admin | Published: July 29, 2016 1:58 AM

मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्यांनाही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावले उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाइल क्रमांकच

मुंबई: मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालण्यासाठी ठेकेदारांएवढेच अभियंत्यांनाही जबाबदार धरत प्रशासनाने कठोर पावले उचलली़ खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे मोबाइल क्रमांकच जाहीर करण्यात आले़ मात्र, अभियंत्यांनी असहकार पुकारून पालिकेची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केल्याने, त्यांना कार्यालयीन मोबाइल देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा खणखणारा फोन उचलणे अभियंता भाग पडणार आहे़ ३५२ कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक झाल्यानंतर अभियंता वर्गातून नाराजीचा सूर उमटत होता़ त्यानंतर, ठेकेदारांकडून दंड वसूल करून त्यांच्या सुटकेचा मार्ग खुला करणाऱ्या सहापैकी दोन कार्यकारी अभियंत्यांना पालिकेने निलंबित केले़ या अभियंत्यांना निलंबित करण्यापूर्वी त्यांची खातेनिहाय चौकशी करावी़ त्यात दोषी आढळल्यानंतरच कारवाई करणे उचित होते, असा युक्तिवाद अभियंत्यांनी मांडला आहे़ मात्र, पालिका प्रशासनाने खड्डे भरण्याची जबाबदारी असलेल्या सर्व अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक परस्पर जाहीर केल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे़ त्यामुळे प्रशासनाने नगरसेवक व खातेप्रमुखांनंतर आता खड्ड्यांची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांनाही मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी)पहिली खबर : काही अभियंत्यांनी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांना पत्र पाठवून आपला व्यक्तिगत मोबाइल क्रमांक वापरण्यास नकार कळविला होता, याची पहिली बातमी ‘लोकमत’ने दिली होती़ अभियंत्यांच्या मोबाइलवर व्हॉट्स अ‍ॅप नसल्याचेही तेव्हा ‘लोकमत’ने निदर्शनास आणले.यासाठी स्मार्ट फोन : काही अभियंता फोन उचलत नसून, काहींनी आपला मोबाइल बंद ठेवला आहे़ त्यामुळे या अभियंत्यांना कार्यालयीन मोबाइल क्रमांक देण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ त्यानुसार, ५४ नवीन स्मार्ट फोन खरेदी करण्यात येणार आहेत़ हे मोबाइल केवळ पावसाळ्यात खड्ड्यांसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी असणार आहेत़