परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर्ड वॉर रूममार्फत पालिकेची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 11:33 PM2021-12-04T23:33:16+5:302021-12-04T23:33:26+5:30
होम क्वारंटाइन नियम मोडल्यास संस्थात्मक विलगीकरणात रवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरही त्यांना सात दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या प्रवाशांवर पालिकेच्या वॉर्ड वॉर रूममार्फत दररोज पाचवेळा फोन करून व अचानक भेट देऊन लक्ष ठेवले जाणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाची रवानगी संस्थात्मक विलगीकरणात होईल, असा सक्त इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
दक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिन्याभरात सुमारे तीन हजार प्रवाशी मुंबईत आले आहेत. त्यांची चाचणी सुरू असून आतापर्यंत एकूण १६ कोरोना बाधित आढळून आले आहेत. परदेशातून आलेला एकही प्रवासी पूर्ण चाचणी झाल्याशिवाय पालिकेच्या नजरेतून सुटू नये, यासाठी यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शनिवारी नियमावली जाहीर केली आहे.
त्यानुसार धोका अधिक (हायरिस्क) आणि धोक्याची शक्यता (अॅटरिस्क) असलेले देश अशी विभागणी करण्यात आली आहे. ‘हायरिस्क’ देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, बोस्वाना व झिम्बाबेचा समावेश आहे. या देशांतून आलेल्या प्रवाशांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांना सात दिवस क्वारंटाइन केले जात आहे. आतापर्यंत १७ प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांनाही होम क्वारंटाइन बंधनकारक आहे.
ओमायक्रॉनचा शिरकाव रोखण्यासाठी...
* हायरिस्क आणि अॅटरिस्क अशा दोन श्रेणीनुसार दररोज सकाळी ९ वाजता प्रवाशांची माहिती विमानतळ प्रशासनाने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवावी. मागील १५ दिवसांतील प्रवाशांची यादीही पाठवावी.
* ही माहिती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाने दररोज सकाळी १० वाजता प्रत्येक प्रभागातील प्रवाशांच्या नावासह वॉर्ड वॉर रुमला आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवावी.
* या प्रवाशांची माहिती, त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीतील जबाबदार व्यक्तीलाही द्यावी. या व्यक्तीने प्रवास करुन आलेली व्यक्ती होम क्वारंटाइनचे नियम पाळत आहे का? यावर लक्ष ठेवावे.
प्रवाशांवर पालिकेची नजर...
* वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून होम क्वारंटाइन प्रवाशांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसेल.
* गरज भासल्यास उपचार करता यावेत यासाठी प्रत्येक वॉर्ड वॉर रूमअंतर्गत दहा रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. सध्या केवळ दोन ते तीन रुग्णवाहिका आहेत.
* नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या क्वारंटाइन व्यवस्थेत ठेवण्यात येईल.
* सातव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होईल, याची खबरदारी घेतली जाणार आहे.