महापालिका, सरकारी, खासगी रुग्णालयांचे होणार पुन्हा ऑडिट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:09 AM2021-04-06T02:09:27+5:302021-04-06T02:09:47+5:30
पालिका प्रशासनाने काढले परिपत्रक
मुंबई : भांडुप येथील सनराइज् रुग्णालय आणि दहिसर कोविड केंद्रात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी, खासगी आणि पालिका रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख सर्व रुग्णालयांचे ऑडिट करून १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करणार आहेत.
पालिकेने दिलेल्या मुदतीनंतर यापैकी काही रुग्णालयांनी आवश्यक दुरुस्त्या केल्या, तर अडीशे रुग्णालयांमध्ये अद्यापही बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, गेल्या महिन्यात भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराइज् रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.
गेल्या रविवारी दुपारी दहिसर येथील कोविड केंद्रात आग लागण्याची घटना घडली. यावेळी ५० रुग्णांना तातडीने अन्य ठिकाणी हलविण्यात आले. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन मुंबईतील सर्व रुग्णालयांच्या ऑडिटचे आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
७६२ रुग्णालये असुरक्षित
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिटी सेंट्रल मॉलला लागलेल्या आगीनंतर महापालिकेने केलेल्या ऑडिटमध्ये मुंबईतील ७६२ नर्सिंग होम, रुग्णालय असुरक्षित असल्याचे उजेडात आले. अग्नी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून या रुग्णालयांमध्ये मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू असतो.