Join us

बोरीवलीच्या भीमनगर झोपड्यांवर पालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:06 AM

लोकमत इम्पॅक्टलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवलीच्या भीमनगर येथील अनधिकृत झोपड्यांवर ‘लाेकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन कारवाई करण्यात आली. ...

लोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरीवलीच्या भीमनगर येथील अनधिकृत झोपड्यांवर ‘लाेकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन कारवाई करण्यात आली. आर. मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व बोरीवली पोलिसांच्या बंदोबस्तात पालिका प्रशासनाने येथील ११ झोपड्या जमीनदाेस्त केल्या.

बोरीवली पश्चिम गोराई येथील भीमनगर नाल्यात भरणी करून ६० ते ७० अनधिकृत पक्क्या झोपड्या बांधणे सुरू होते. उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरीवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे यांच्या सूचनेनुसार बोरीवलीच्या भाजप महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा निवळे व नगरसेविका अंजली खेडकर यांनी नुकतेच स्टिंग ऑपरेशन आणि फेसबुक लाईव्ह करून यावर प्रकाशझोत टाकला होता. यावेळी जागेवर जाऊन पाहणी केली असता ६० ते ७० झोपड्यांचे पक्के बांधकाम करून झोपडपट्टी दादा त्या झोपड्या विकत असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती रेश्मा निवळे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यानंतर ‘बोरीवलीत उभी राहतेय मिनी धारावी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ ऑनलाइन आणि ‘लोकमत’मध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले.

त्यानंतर पालिकेची यंत्रणा कामाला लागली. आमदार सुनील राणे यांनी सदर बांधकाम निष्कासित करण्याची मागणी लावून धरली. आर. मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व बोरीवली पोलिसांच्या बंदोबस्तात पालिका प्रशासनाने येथील ११ झोपड्यांवर तोडक कारवाई केली. परंतु अजूनही अनधिकृत झोपड्या येथे असून त्यावर पालिकेने कारवाई केलीच पाहिजे व संबंधित झोपडपट्टी दादांवर एमआरटीपी दाखल करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

उर्वरित झोपड्यांवर येत्या सोमवारी पुन्हा कारवाई होणार असून जर कारवाई झाली नाही तर पालिकेला घेराव घालण्यात येईल असे भाजपतर्फे सांगण्यात आले. या करवाईबद्दल गोराईकरांनी समाधान व्यक्त केले आहे. तर ‘लोकमत’ने सदर वृत्त देऊन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

..............................................................