मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील नियमबाह्य बांधकामाप्रकरणी दिलेल्या नोटीसची मुदत बुधवारी सकाळी संपली. बांधकामासाठी पालिकेकडून घेतलेल्या परवानगीची कागदपत्रे तिने २४ तासांच्या मुदतीत सादर न केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस फौजफाट्यासह कारवाईला सुरुवात केली. सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायलयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतर थांबविण्यात आली.
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने येथे ‘मणिकर्णिका फिल्म्स प्रा. लि.’ नावाने कार्यालय थाटले. गेले काही दिवस ती वादग्रस्त टिष्ट्वटमुळे चर्चेत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून तिने सातत्याने मुंबई पोलीस आणि शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी उपमा देऊन शिवसेनेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान, एच पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कार्यालयातील १४ नियमबाह्य बांधकामांप्रकरणी तिला ‘काम थांबविण्याची’ नोटीस मंगळवारी सकाळी बजावण्यात आली.
कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या नोटीसनुसार, तिला २४ तासांची मुदत पालिकेने दिली होती. त्या वेळी कंगना मोहालीमध्ये असल्याने तिच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी पालिकेकडून सात दिवसांची मुदत मागितली. मात्र कंगनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न आल्याचे कारण देत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि एच पश्चिम विभागाच्या ४० कर्मचारी - अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात पाडकामाला सुरुवात केली. तळमजला, पहिला मजला आणि कार्यालयाबाहेरील वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले.पालिका अधिकाºयांनी बुधवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास कंगनाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुसरी नोटीस चिकटवली. त्यानंतर अधिकाºयांनी तिच्या बंगल्यात प्रवेश करीत नियमबाह्य कामांचे चित्रीकरण केले; तसेच छायाचित्रे काढली. त्यानंतर पालिका कर्मचाºयांनी हातोडा मारण्यास सुरुवात केली. तर प्रवेशद्वारावरील बेकायदा बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले.
दरम्यान, उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारवाई थांबविल्याची माहिती एच-पश्चिमचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली. न्यायालयाच्या निर्देशानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.