Join us

गेल्या तीन वर्षांत महापालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पाचा विनियोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 1:20 AM

प्रजा संस्थेचा अहवाल : मुंबईच्या आरोग्याचा लेखाजोखा उघड

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडवली खर्चाच्या निधीचा वापर सातत्याने कमी राहिलेला असून २०१८-१९मध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या निधीपैकी ५४ टक्के रक्कम वापरली नसल्याचे उघडकीस आले आहे, मुंबई महानगरपालिकेने मागील तीन वर्षांत आरोग्य अर्थसंकल्पातील निधीचा विनियोग केला नसल्याचे वास्तव प्रजा संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.

२०१६-१७ मध्ये अर्थसंकल्पातील ७३ टक्के निधी वापरला नव्हता, तर २०१७-१८ मध्ये ४७ टक्के निधी वापरला नसल्याचे अहवालात नमूद आहे. प्रजा संस्थेच्या अहवालानुसार, रूग्णालयांचे आणि आरोग्य केंद्रांचे नामकरण करण्याला महापालिकेच्या आरोग्य समितीने सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसते़ २०१९-२० मध्ये सर्वाधिक १७ प्रश्न नामकरणासंबंधी होते, तर मधुमेह वा क्षयाबाबत एकही प्रश्न विचारण्यात आला नाही.

प्रजा संस्थेच्या मुंबईतील आरोग्य क्षेत्राच्या सद्यस्थितीवरील अहवालानुसार, मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत संरचा आणि मनुष्यबळ यांकडे खूप काळ दुर्लक्ष झाल्याचे दुष्परिणाम सध्याच्या कोविडच्या आपत्तीकाळातील आरोग्य सेवेवर पडत असल्याचे दिसते आहे. २०१९ वर्षांमध्ये महानगरपालिका रुग्णालयामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ४७ टक्के पदे आणि पॅरामेडिकलची ४३ टक्के पदे रिक्त असून एकूण रिक्त पदांचे प्रमाण ३० टक्के आहे.

कोविडच्या महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा दबाव वाढला ही समस्या खरी आहे. परंतु अक्षम पायाभूत संरचना, अपुरे मनुष्यबळ आणि निधीचा अप्रभावी वापर ही आरोग्य व्यवस्थेची स्थिती असल्याने नागरिकांना एरवी भेडसावणाºया रोगांचा उपचार व्यवस्थाही सुरळीत चालण्यामध्ये अडचणी येत आहेत, असे मत प्रजा फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी मांडले.

२०१९ मधील आकडेवारीनुसार महानगरपालिका रूग्णालयामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ६२ टक्के पदे आणि प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोविडच्या उपाययोजनांमध्ये सरकारी आरोग्य यंत्रणा आघाडीवर असली तरीही आधीपासूनच अपुरे मनुष्यबळ असल्याने आणि अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची सज्जता नसल्याने यंत्रणेवरचा ताण वाढला आहे, असे मेहता यांनी नमूद केले आहे.

लॉकडाऊनमध्ये कोरोनाव्यतिरिक्त अधिक मृत्यूप्रजा संस्थेच्या अहवालानुसार, मे महिन्यात लॉकडाऊन सुरू असताना कोविडमुळे ९५७ मृत्यू झाले, तर त्याच वेळेस कोविडव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे १२ हजार ८७६ मृत्यू झाल्याचे म्हटले आहेत. तर जून महिन्यात कोविडमुळे ३ हजार २३६ बळी गेल्याची नोंद आहे, तर अन्य कारणांमुळे ७ हजार ८८३ मृत्यू झाले आहेत. मुंबईत कोरोनामुळे सरासरी दररोज ४९ रुग्णांचा मृत्यू ओढावत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर २०१८ साली मुंबईत मधुमेहामुळे दररोज २९, कर्करोगामुळे २८, श्वसनविकारांमुळे २२, तर क्षयरोगामुळे १४ मृत्यू होत असल्याची अहवालात नोदं आहे.