महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी महापालिकेचा मदतीचा हात; रुग्ण वाढत असल्याने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:12 AM2020-07-19T03:12:11+5:302020-07-19T06:07:17+5:30
मुंबईत आतापर्यंत ९८ हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश येत आहे. मात्र मुंबई महानगरातील ठाणे, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या क्षेत्रांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुलुंड आणि दहिसर येथील तब्बल १५०० खाटा मुंबईबाहेरील रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अतिदक्षता विभागातील शंभर खाटाही वाढवून देण्यात येणार आहेत.
मुंबईत आतापर्यंत ९८ हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर शनिवारपर्यंत मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर सरासरी १.३० टक्के एवढा आहे. मुंबईतील बाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी १२००च्या आसपास असली तरी यापैकी दोनशेहून कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी बांधलेल्या केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये बहुतांश खाटा रिक्त आहेत. त्याच वेळी ठाणे, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई येथील रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे.
मात्र त्या तुलनेत या छोट्या महानगरपालिकांमध्ये रुग्णालय कमी असून कोविड केअर सेंटरचीही सुविधा नाही. त्यामुळे आता महानगर क्षेत्रातील अन्य महापालिकांना आता मुंबई महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. याअंतर्गत मुलुंड येथील जम्बो फॅसिलिटी केअर सेंटरमधील एक हजार खाटा ठाणे महापालिकेसाठी, तर पाचशे खाटा दहिसरमध्ये राखून ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात असल्यामुळे कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील सात हजार खाटा रिक्त आहेत. त्यामुळे अन्य महापालिकांसाठी १५०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- इक्बाल सिंग चहल, मुंबई महापालिका आयुक्त
मुलुंड आणि दहिसर येथील जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील अनुक्रमे पाचशे आणि दोनशे खाटा ठाणे महापालिकेसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये राखीव चारशे खाटा मीरा-भार्इंदर येथील रुग्णांसाठी, मुलुंड येथील चारशे खाटा भिवंडी निजामपूर येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत. अन्य पालिकांच्या विनंतीनुसार मुंबई पालिकेने रिक्त १५०० खाटा बाहेरील रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत.
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त