मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या दहशतीमुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत. या विषाणूसंदर्भात समाज माध्यमांवरही अनेक समज-गैरसमज पसरविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने हेल्पलाइन सुरू केली आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने १९१६ या क्रमांकावर संपर्क करून कोरोनाविषयी शंकांचे निरसन करण्याची सेवा चोवीस तास उपलब्ध आहे.हेल्पलाइनच्या माध्यमातून विषाणू संदर्भातील मदत, प्रश्न व शंका सामान्य नागरिक विचारू शकतात. याशिवाय, कोणत्या रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत, प्राथमिक लक्षणे कोणती, अशा सर्व गोष्टींची माहिती मिळेल.
कोविड-१९ (कोरोना) विषाणूचा प्रतिबंध, उपचार व नियंत्रणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पालिका रुग्णालयांत प्रसारित करण्यात आली आहेत. या आजारासाठी गर्भवती, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कर्करुग्ण व रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती हा संवेदनशील गट आहे. या आजारावर नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयांतही विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात यावेत, असे निर्देश खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.विलगीकरण कक्षमुंबई शहर-उपनगरात कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर, सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.