Join us

प्लॅस्टिक जमा करण्यासाठी पालिकेची हेल्पलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:35 AM

प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे

मुंबई : प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, घराघरांतील प्लॅस्टिक पिशव्या जमा करण्यासाठी प्रत्येक विभागात वेगवेगळ्या रंगाच्या कचरापेट्या ठेवल्या आहेत. मात्र, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याने, महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून वाहनाद्वारे प्लॅस्टिक उचलून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे.राज्य सरकारने प्लॅस्टिक आणि थर्माकोलसारख्या वस्तूची विल्हेवाट लावण्याबाबत अधिसूचना काढली आहे. २३ जूननंतर प्लॅस्टिकचा वापर करणारे नागरिक, विक्रेते आणि उत्पादकांवर कारवाई सुरू होणार आहे. तत्पूर्वी प्लॅस्टिक बंदीबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.यासाठी सर्व मंडईसह सार्वजनिक ठिकाणी जागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर, आता टोल फ्री क्रमांकाद्वारे प्लॅस्टिक बंदी आणि सुका कचरा वर्गीकरण केंद्राची माहिती देण्यात येणार आहे.या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधल्यास, त्यांच्या घरातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल व अन्य प्लॅस्टिक वस्तूंची विल्हेवाट कशा प्रकारे आणि कुठे लावली जाईल, याची माहिती मिळेल, तसेच प्लास्टिक वस्तू जमा करण्यासाठी २४ विभागांमध्ये प्रत्येकी एक वाहन असणार आहे. त्यामुळे टोल फ्री क्रमांकावर फोन आल्यानंतर, संबंधित विभागाची तक्रार त्या विभागाकडे वर्ग करून त्यांच्या माध्यमातून प्लॅस्टिक गोळा करण्यात येणार आहे.३७ केंद्रे कार्यान्वितसध्या महापालिका क्षेत्रात ३७ कचरा वर्गीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या व्यतिरिक्त प्रतिबंधित प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका क्षेत्रात सुमारे १०० ठिकाणी ‘प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग यंत्र’ बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले.सकाळी ९ ते रात्री ९ टोल फ्री सेवाप्रतिबंधित प्लॅस्टिक संकलनाकरिता ६५ ठिकाणी यापूर्वीच कचरा संकलन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही कचरा संकलन केंद्रे प्रामुख्याने महापालिकेच्या मंडयांमध्ये व अधिक वर्दळीच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त सोसायट्यांच्या किंवा व्यवसायिक संघटनांच्या स्तरावर १० किलोपेक्षा अधिक प्लॅस्टिक संकलन करण्यात आल्यास, त्याबाबत १८००-२२२-३५७ या टोल फ्री क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.