Join us

पालिकेची रुग्णालये सुपरस्पेशालिटी होणार; मुख्यमंत्री : स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 9:43 AM

मुंबईच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत रविवारी मुख्यमंत्र्यांनी घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेची सर्वच रुग्णालये अद्ययावत करून सुपरस्पेशालिटी सुविधा पुरवा, अद्ययावतीकरणासह स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित करा. रुग्णालयाचा आजूबाजूचा परिसर, रुग्णालय इमारत स्वच्छ असली पाहिजे, प्रसन्न वातावरण पाहून रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना आनंद झाला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिल्या आहेत. 

मुंबईच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत रविवारी मुख्यमंत्र्यांनी घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजावाडी रुग्णालयाच्या आवारात स्वच्छता केल्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या विस्तारित इमारत बांधकाम प्रगतीचा आढावा घेतला. रुग्णालय आवारात जमलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी हस्तांदोलन केले. स्वच्छता जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी झळकावलेले संदेश पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.जानेवारीपासून ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’

जानेवारीपासून महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ उपक्रम राबविण्याचे निश्चित केले असून रुग्णांसाठी बाहेरून औषध घ्यायची गरज पडणार नाही, अशा स्वरूपाची ही योजना असल्याची माहिती ही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

मोफत उपचारांमुळे मिळणार दिलासा राजावाडी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाची कामे वेगाने सुरू असून, पुढील दोन महिन्यांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाचे काम सुरू होणार आहे.  राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या ५९६ खाटा असून, नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ४२४ खाटा असणार आहेत. त्यामुळे राजावाडी रुग्णालयातील खाटांची क्षमता १०२० इतकी होणार आहे.  या रुग्णालयामध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, कॅथलॅब, अतिदक्षता विभाग, ऑन्कोलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रो ओंटोलॉजी आणि पाच मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग असणार आहेत. राजावाडी सुपरस्पेशालिटी रुग्णालयामध्ये महागडे उपचार रुग्णांना मोफत मिळणार असून त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

टॅग्स :एकनाथ शिंदे