मुंबई : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून ३० एप्रिल रोजी प्रायोगिक तत्त्वावरील आयसीएसई व सीबीएसई शाळांतील प्रवेशांसाठी ऑनलाईन पद्सोधतीने सोडत जाहीर करण्यात आली. ही प्रवेशप्रक्रिया झूम अप्लिकेशनद्वारे पार पाडण्यात आली आणि यामध्ये पालक व विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यापुढे १० मे पर्यंत पालकांना गुगल फॉर्म भरून आपल्या प्रवेशाची निश्चिती करायची आहे. याच कालावधीत ज्या इयत्तांसाठी लॉटरी पद्धती राबविण्यात आली नाही त्या पालकांकडूनही गुगल फॉर्म भरून प्रवेश निश्चिती करून घेतली जाणार आहे.
ही ऑनलाईन सोडत मुंबई महापालिकेच्या प्रायोगिक तत्त्वारील पूनम नगर येथील सीबीएसई आणि वूलन मिल येथील आयसीएसई शाळासाठी राबविण्यात आली. वुलन मिल येथील आयसीएसई मंडळाच्या शाळेमध्ये एकूण ३०८ जागांसाठी ३६० अर्ज आले होते. तर जोगेश्वरी पूर्व, पूनम नगर येथील सीबीएसई शाळेतील ३०४ जागांसाठी २०००हून अधिक अर्ज आले होते. आयसीएसई शाळेच्या पूर्व प्राथमिकच्या २ वर्गांसाठी व पहिलीच्या वर्गासाठी सोडत जाहीर करण्यात आली तर दुसरी ते सहावीच्या वर्गांसाठी क्षमतेपेक्षा कमी म्हणजेच ३८ हून कमी अर्ज आल्याने त्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात आले आहेत. या दोन्ही शाळांचे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होणार असून निवड झालेल्या पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनची परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेण्यात येणार असला तरी मुलाना ऑनलाईन लर्निंगद्वारे काही अभ्यास दिला जाईल ज्यामुळे या दरम्यान त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
पालिका शाळांतील सीबीएसई , आयसीएसई मंडळाचा हा पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी होण्याची चिन्हे आहेत.आतापर्यंत कुठल्याही खाजगी शाळांतही प्रवेशप्रक्रियेसाठी इतकी पारदर्शकता दाखविण्यात आली नसेल. पालिकेच्या शाळांतील केंद्रीय मंडळाचे असले तरी हे प्रवेश विनाशुल्क असणार आहेत. या प्रायोगिक तत्त्वावरील शाळांमुळे पालिका शाळांना संजीवनी मिळून त्यांमधील गळती आटोक्यात येऊ शकेल.- साईनाथ दुर्गे , पालिका , शिक्षण समिती कार्सयकारिणी दस्य , युवसेना सदस्य