मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने सण उत्सवाचा आगामी काळ हा धोकादायक असल्याचे सांगत हेल्थअलर्ट जारी केला आहे. या सण उत्सवाच्या काळात गर्दी आणि सार्वजनिक वावरण्यावर बंधने घातली आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव होईल अशी काही कृती केल्यास साथरोग कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शारीिरक अंतर पाळले जाईल याकडे लक्ष द्यावे. त्याचसोबत मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सार्वजनिक आरोग्याबाबत प्रत्येकाने साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून टाकावा, संपूर्ण परिसरात शक्य तितकी स्वच्छता राखावी.
संपूर्ण मुंबईत लालबाग, परळ, शिवडी आणि नायगाव या भागातील रुग्ण संख्या सर्वाधिक असल्याचा दावा केला आहे. म्हणूनच या भागात गणेशोत्सव काळात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी या भागात गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये म्हणून सरकारने या भागात गणेशोत्सव काळात राज्यभरातून येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवेश बंदी केली आहे. या परिसरातील गणेशमूर्तींचे दर्शन ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात मावा आणि माव्याचा वापर करून तयार केलेले पदार्थ खरेदी केले जातात. हे पदार्थ शिळे असतील तर अशा पदार्थांच्या सेवनामुळे अनेक रोग उद्भवू शकतात. त्यामुळे हे पदार्थ खरेदी करताना तपासून करावेत. याबाबतीत काही मदत लागल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील वरिष्ठ निरीक्षक , वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.