म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये फूट, शशांक रावना केले दूर, मुंबईच्या कामगार चळवळीला ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:49 PM2017-12-02T23:49:13+5:302017-12-02T23:49:40+5:30
ज्या संघटनांच्या ताकदीवर जॉर्ज फर्नांडिस व त्यानंतर शरद राव यांनी अनेकदा मुंबई बंद केली, त्या संघटना आता वेगळ्या झाल्या आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियन ताब्यात घेण्याचा शशांक राव यांचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांना तिथे कोणत्याही पदावर घेण्यात आलेले नाही.
- संजीव साबडे
मुंबई : ज्या संघटनांच्या ताकदीवर जॉर्ज फर्नांडिस व त्यानंतर शरद राव यांनी अनेकदा मुंबई बंद केली, त्या संघटना आता वेगळ्या झाल्या आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियन ताब्यात घेण्याचा शशांक राव यांचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांना तिथे कोणत्याही पदावर घेण्यात आलेले नाही. मात्र बेस्ट वर्कर्स युनियन, आॅटोरिक्षामेन्स युनियन व मुंबई हॉकर्स युनियन या संघटना शशांक राव यांच्याकडे राहिल्या आहेत. शशांक राव हे दिवंगत नेते शरद राव यांचे पुत्र आहेत.
एक काळ असा होता की जॉर्ज फर्नांडिस व नंतर शरद राव हे म्युनिसिपल मजदूर युनियन, हॉकर्स युनियन, लेबर युनियन, बेस्ट वर्कर्स युनियन, टॅक्सीमेन्स युनियन, गुमास्ता युनियन या संघटनांच्या आधारे संपूर्ण मुंबई बंद करून दाखवत. ‘मुंबई बंद सम्राट’ असे नावच त्यांना पडले होते. त्याबद्दल त्यांच्यावर टीका होत असे. मात्र कामगार संघटना ही त्यांची ताकद होती. तिचा ºहास होताना दिसत आहे. टॅक्सीमेन्स युनियन पूर्वीच वेगळी झाली आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनच्या बैठकीत शशांक राव यांच्या समर्थकांनी रमाकांत बने यांना सरचिटणीस करा, अशी मागणी केली. ती मान्य झाली नाही आणि पन्नास वर्षे संघटनेत असलेले महाबळ शेट्टी यांची पुन्हा त्या पदी निवड झाली. त्यानंतर उपाध्यक्षपदी असलेले शशांक राव यांना उपाध्यक्षपद देण्यात आले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेतील कामगारांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये फूट पडली आहे. मात्र युनियनच्या सर्वसाधारण बैठकीत बहुसंख्य कामगार प्रतिनिधींनी महाबळ शेट्टी यांना व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाºयांनाच पाठिंबा दिला.
शशांक राव व रमाकांत बने आता महापालिका कामगारांची नवीन संघटना स्थापन करणार का, हे स्पष्ट झालेले नाही. रमाकांत बने यांनी युनियनच्या पदांचाही राजीनामा दिला आहे. परिणामी, म्युनिसिपल मजदूर युनियनवर महाबळ शेट्टी यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सध्यातरी बहुसंख्य कामगार या संघटनेसोबतच आहेत. आपले वडील शरद राव यांच्या निधनानंतरच शशांक राव युनियनमध्ये सक्रिय झाले आहेत.
अर्थात बेस्ट वर्कर्स युनियन, आॅटोरिक्षामेन्स युनियन व हॉकर्स युनियन या आधीपासून शरद राव यांच्याकडेच होत्या आणि यापुढेही त्या राहतील, असे दिसते. त्या संघटनांमध्ये महाबळ शेट्टी वा अन्य नेते नव्हते. त्यामुळे राव यांना तिथे आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाही.
म्युनिसिपल मजदूर युनियन व मुंबई लेबर युनियन या दोन मोठ्या संघटनांशी मात्र शशांक राव यांचा संबंध राहणार नाही, असे समजते. या संघटनांची करी रोड येथे बाळ दंडवते स्मृती नावाची इमारत आहे. तसेच तळेगावमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया विद्यापीठ नावाची संस्था व इमारत आहे. या मालमत्ता वरील दोन युनियनच्या नावावर असून, युनियनचे पदाधिकारी तिथेही पदाधिकारी आहेत. तिथे शशांक राव नाहीत.
चळवळच अस्तंगत
गेल्या काही वर्षांत मुंबईतील कामगार चळवळ अस्तंगत होत गेली आहे. गिरण्या व इंजिनीअरिंग उद्योग बंद झाले. एकपडदा थिएटर्स बंद झाली. रेस्टॉरंट्स बंद झाली व बहुतांशी ठिकाणी बार आले. त्यातील कामगारही एकत्र राहिले नाहीत. मात्र वरील संघटना भक्कम राहिल्या होत्या. त्याही आता नेतेपदाच्या शर्यतीमुळे वेगवेगळ्या झाल्याने या संघटनांची एकत्र ताकद यापुढे पाहायला मिळण्याची शक्यता मालवली आहे.