पश्चिम उपनगरातील महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:15 AM2018-12-07T04:15:06+5:302018-12-07T04:15:17+5:30
पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत गरीब रुग्णांना परवडणाऱ्या किमतीमध्ये औषध व सामग्री उपलब्ध होत आहे.
मुंबई : पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत गरीब रुग्णांना परवडणाऱ्या किमतीमध्ये औषध व सामग्री उपलब्ध होत आहे. हा
लाभ मुंबईतील गरजू रुग्णांनाही मिळावा यासाठी पश्चिम उपनगरातील महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही जनऔषधी केंद्रे सुरू करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
पालिका रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना नाममात्र शुल्कात उपचार देण्यात येतात. मात्र महागडे उपचार परवडत नसल्याने महापालिका रुग्णालयातही मोफत दिले जात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या जनऔषधी केंद्राचा लाभ मुंबईतील गरजू रुग्णांनाही मिळू द्यावा, अशी नगरसेविका अर्चना भालेराव यांची मागणी पालिका महासभेत मंजूर झाली होती.
ही मागणी मान्य करीत बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, सांताक्रुझ
येथील देसाई या तीन उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रायोगिक
तत्त्वावर सार्वजनिक खासगी सहभाग प्रोत्साहन प्रकल्पांतर्गत जनऔषधी केंद्रासाठी निविदा प्रक्रिया
राबविण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
>उपनगरीय रुग्णालयात मिळणार जागा
तीन उपनगरीय रुग्णालयांतील जनऔषधी केंद्रांना रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास महापालिकेच्या अन्य सर्व उपनगरीय रुग्णालयांत अशा केंद्रासाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
महागडी औषधे स्वस्तात
पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामध्ये उच्च प्रतीची औषधे, उपकरणे किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध केली जातात.
या केंद्रांमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आदी रोगांवरील दुर्मीळ औषधे व इतर पाचशेहून अधिक औषधे, मोठ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध केली जातात.