सदानंद नाईक, उल्हासनगर : उल्हासनगरयेथील कॅम्प नं-1 धोबीघाट येथील डोंगर उतारावरील काही घरांना मोठ-मोठे तडे गेले आहेत. तसेच, या पावसाच्या वातावरणात या घरांमुळे काही अघटीत घटना घडू शकतात, म्हणून महापालिकेने नोटिसा देऊन घरे खाली करण्यास सांगिले आहे. या नोटिसा मिळल्यामुळे आधीच जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मनसेने या नागरिकांसाठी पर्यायी जागेची मागणी केली आहे.
उल्हासनगर धोबीघाट परिसरातील डोंगर उतारावरील घरांना मोठ्या चिरा पडल्या आहेत. आधीच मुंबईत सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आह, त्यात अनेक ठिकाणी दरड कोसळून अपघात झाल्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनीं 12 पेक्षा जास्त घरांना नोटिसा देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घरे खाली करण्या सांगितले आहे. पण, नोटिसा मिळालेल्या नागरिकांनी संततधार पावसात जायचे कुठे? असा प्रतिप्रश्न महापालिका अधिकाऱयांना केला.
नोटिसा देण्यात आलेल्या काही घरांना तडे गेले असून असाच संततधार पाऊस सुरू राहिल्यास घरांना धोका निर्माण होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, शहर संघटक मेनुद्दीन शेख यांनी डोंगरावरील घराची पाहणी करून, तडे गेलेल्या घरातील नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी महापालिकेकडे केली. बंद असलेल्या महापालिका शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणे त्यांनी उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडे सुचविले आहेत.
शहरातील धोकादायक इमारती मधील तसेच पुराचा तडका बसलेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था महापालिका निर्माण करीत आहे. मात्र दुसरीकडे डोंगर उतारावरील तडे गेलेल्या घरातील नागरिकांना पर्यायी व्यवस्था का नाही, महापालिकेचा दुजाभाव का? असे प्रश्न मनसेने उपस्थित केलेत. गेल्या वर्षी डोंगरकडावरील माती खचल्याने काही घरांचे नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका मुंबई, ठाणे सारख्या घटनेची अपेक्षा करते की काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. महापौर लिलाबाई अशान यांच्यासह अधिकाऱ्यांनी तडा गेलेल्या घराकडे पाठ फिरविल्याची टीका मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी केली आहे.