महिला सहकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:09+5:302021-03-05T04:07:09+5:30
शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई महिला सहकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला बेड्या शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई
महिला सहकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला बेड्या
शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कार्यालयातील महिला सहकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तो पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत आहे.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुधवारी रात्री तक्रारदार महिलेने शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. यात, आरोपीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. त्यानुसार गुरुवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. महिलेने पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेदेखील याची तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यात आणखीन काही महिला सहकारीही तक्रारीसाठी पुढे आल्याचे समजते.
‘तो’ अधिकारी निलंबित
कार्यालयात तरुणीसोबत असभ्य वर्तन केल्यामुळे महिलेने साहाय्यक आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार तत्काळ तीन महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशी सुरू करण्यात आली. अशात अधिकाऱ्याविरुद्ध आणखीन एका तरुणीची तक्रार समोर आली. समितीने त्यानुसार अहवाल तयार करून पालिकेकडे सादर केला. यात दोन्ही तरुणींच्या जबाबाचा समावेश आहे. या अहवालानंतर ‘त्या’ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.