मुंबई : मुसळधार पावसात पालिकेचे दावे फोल ठरत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे़ सतत पाऊस पडत राहिल्यास मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून हजेरी सक्तीची केली आहे़ नालेसफाईच्या कामाचा यंदा बोजवारा उडाला असल्याने, मुंबईत पाणी तुंबणार, अशी भीती विरोधकांबरोबर सत्ताधारीही व्यक्त करीत आहेत़ गेले दोन दिवस मुंबईत दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने तशी झलकही दाखविली़ काही सखल भागांमध्ये पाणी तुंबत असून, पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत़ मात्र, मोठ्या भरतीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची भीती आता प्रशासनही व्यक्त करू लागले आहे़ त्यामुळे अशा आणीबाणीच्या काळात सहायक आयुक्त व उपायुक्तांनी ड्युटीवर असावे, यासाठी या सर्व अधिकाऱ्यांच्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्या, सार्वजनिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)
पालिका अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
By admin | Published: June 26, 2016 4:08 AM