Join us

महापालिकेच्या क्रीडांगणाची दुरवस्था

By admin | Published: May 06, 2017 6:38 AM

मालाड येथील मालवणी क्रमांक ६ येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मोहम्मद रफी क्रीडांगणाची कमालीची दुरवस्था झाली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाड येथील मालवणी क्रमांक ६ येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मोहम्मद रफी क्रीडांगणाची कमालीची दुरवस्था झाली आहे. या उद्यानाची अवस्था सध्या फारच बिकट बनलेली आहे. या मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आहेत. मात्र, यातील बरीचशी खेळणी मोडकळीस आलेली आहेत. व्यायामाचे साहित्यदेखील मोडक्या अवस्थेत आहे. मैदानाच्या परिसरात सर्रास लग्न समारंभासारखे कार्यक्रम केले जातात. क्रीडांगणाच्या आवारात शौचालयाची व्यवस्थादेखील उपलब्ध नाही. अवैध पार्किंगही या मैदानात सर्रास केले जाते. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने, या मैदानात लहान मुले खेळायला येतात. मात्र, मैदानासमोर असलेल्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य या मैदानात गेल्या कित्येक दिवसांपासून पडून आहे. या साहित्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. मैदानाच्या आवारात बांधकामासाठीच्या लोखंडी सळ्यादेखील उघड्यावर पडलेल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. हे मैदान लवकरात लवकर फक्त मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करण्यात यावे, तसेच तुटक्या स्थितीतील साहित्याचीदेखील दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील पालक आणि लहान मुलांमधून होत आहे. साहित्य मोडकेतोडकेआम्ही क्रीडांगणात उन्हाळी सुट्टी पडल्यापासून नेहमी खेळायला येतो, पण येथे खेळाचे साहित्य पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. कोणीही याकडे लक्ष देत नाही. याचा त्रास आम्हाला खेळताना होतो, असे क्रीडांगणातील खेळणाऱ्या मुलांनी सांगितले.अधिकाऱ्यांचेही कमालीचे दुर्लक्ष मोहम्मद रफी क्रीडांगणामध्ये नाल्याच्या बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी सळ्या ठेवलेल्या आहेत. त्या व्यवस्थित न ठेवता अशाच उघड्यावर ठेवलेल्या आहेत. खेळता-खेळता एखादा मुलगा धावत जाऊन लोखंडी सळीवर पडला, तर मोठी दुर्घटना होऊ शकते, तसेच क्रीडांगणामध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. सुरक्षा रक्षकाला कार्यालयाची सोय नाही. - अफजल हुसैन, मोहम्मद रफी क्रीडांगण, सुरक्षारक्षकलवकरच बदल दिसून येतील...काही दिवसांत बदल दिसेल. रस्त्याच्या कडेला जे काम चालू आहे, तिथे पुरेशी जागा नसल्या कारणाने तिथे बांधकामाचे साहित्य ठेवले गेले आहे. ते व्यवस्थित बाजूला ठेवले जाणार आहे. लग्न समारंभासारखे कार्यक्रम येथे होतात, त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. लहान मुलांसाठी खेळणी आहेत, तीदेखील लवकरच दुरुस्ती केली जातील. - एच. पी. गोसावी, सहायक उद्यान अधीक्षक, पी/उत्तर.