Join us

मेट्रो ३ प्रकल्पाला पालिकेचे भूखंड

By admin | Published: June 05, 2016 12:47 AM

फोर्ट येथील हुतात्मा चौक बाधित होणार असल्याने मेट्रो ३ प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला भाजपाने दणका दिला आहे़ महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य

मुंबई : फोर्ट येथील हुतात्मा चौक बाधित होणार असल्याने मेट्रो ३ प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेला भाजपाने दणका दिला आहे़ महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिकाराचा वापर केला आहे़ त्यानुसार, या प्रकल्पासाठी १७ भूखंड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सोपविणे पालिकेला भाग पडणार आहे़ हा प्रस्ताव मंगळवारी पालिकेच्या महासभेत चर्चेसाठी येणार असल्याने उभय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत़कुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो तीन प्रकल्पासाठी एमएमआरडीएने पालिकेकडे १७ भूखंड ३० वर्षांसाठी देण्याची विनंती केली होती़ या मोबदल्यात पालिकेला २७८ कोटी रुपये मिळणार होते़ मात्र, या प्रकल्पात फोर्ट येथील ऐतिहासिक हुतात्मा चौक स्मारकाची जागा जाणार आहे़ त्यामुळे शिवसेनेने हा प्रस्ताव सुधार समितीमध्ये विरोधी पक्षांच्या मदतीने फेटाळून लावत भाजपाची कोंडी केली होती़ त्यामुळे राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पालिकेला कलम ५२० अंतर्गत नोटीस पाठवून लोकहितासाठी हे भूखंड मेट्रोला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत़ मंगळवारी होणाऱ्या पालिकेच्या महासभेपुढे हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे़ या प्रस्तावाला शिवसेना पुन्हा विरोध करण्याची शक्यता आहे़ मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास खात्यातूनच असे आदेश निघाल्यामुळे शिवसेनेचे हात बांधले गेले आहेत़ त्यामुळे शिवसेनेने कितीही आवाज उठविला, तरी मेट्रोसाठी १७ भूखंड एमएमआरडीएकडे हस्तांतरित करणे भाग पडणार आहे़ (प्रतिनिधी)मेट्रो प्रकल्पाला विरोध कशासाठी ?कुलाबा ते सांताक्रुझ मेट्रो ३ या प्रकल्पासाठी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात येणार आहे़ मात्र, या प्रकल्पाच्या मार्गात येथील वृक्ष आड येत असल्याने तब्बल २५४ वृक्षांची तोड होणार आहे़ यामध्ये दोन हजार ४४ वृक्षांच्या पुनर्रोपणाचाही प्रस्ताव आहे़, परंतु विकासाचा मुद्दा लक्षात ठेवून हा प्रस्ताव पुढे नेण्याचा सूर भाजपाने लावला होता़ मेट्रो प्रकल्पांसाठी मोक्याचे भूखंड भाड्याने देण्याच्या पालिकेच्या या भूमिकेला सुधार समिती सदस्यांनी विरोध दर्शविला होता़ या प्रकल्पात गिरगावमधील काही इमारती पाडाव्या लागणार आहेत़