लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. काही दिवसापासून बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने एक लाख बेडचे नियोजन केले आहे. तसेच औषधांचा साठा, ऑक्सिजन प्लांटची चाचणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागणीप्रमाणे ऑक्सिजनची निम्मी गरज भागविण्याची आता मुंबईची क्षमता आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांवर पोहोचल्याने दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागली. या काळात काही खासगी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. तरी सर्व ठिकाणी तात्काळ मदत यंत्रणा पोहचविण्यात पालिकेला यश आले. त्यानंतर महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीत आत्मनिर्भर होण्यासाठी पावले उचलली. त्यानुसार प्रत्येक रुग्णालय आणि कोविड केंद्राची माहिती घेऊन त्यातील प्रत्यक्षात ऑक्सिजन खाटांचा वापर किती होतो? याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार ७७ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. तर दोन ठिकाणी पुनर्भरणा व साठवणूक केंद्र तयार करण्यात आले आहेत.
आणि सुरू झाली बचत....
पालिका प्रशासनाने मुंबईतील रुग्णालय, कोविड केंद्रातील ऑक्सिजन बेडचा वापर किती? याची माहिती गोळा केली. त्यानंतर वापराच्या २० ते ३० टक्के अधिक अशाप्रकारे वापर गृहित धरून ऑक्सिजन वापराचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजनची दररोजची गरज २३५ मेट्रिक टन असतानाही त्याचा वापर नियंत्रणात राहिला.
असे सुरू आहेत प्रकल्प...
पालिकेची सर्वसाधारण रुग्णालये आणि जम्बो कोविड केंद्रात ७७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मध्यवर्ती यंत्रणेमार्फत पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक खाटांना जोडला गेला आहे. मात्र सावधगिरी म्हणून ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्याचीही तयारी करण्यात आली आहे.
ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाल्यास एका कॉलवर अर्ध्या तासात २५ जम्बो सिलिंडर पोहचविण्यासाठी सहा वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत.
पालिका जम्बो कोविड केंद्र आणि प्रमुख रुग्णालयांच्या १६ ठिकाणी हवेतील ऑक्सिजन निर्मिती करीत आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक याप्रमाणे ४० मेट्रिक टन क्षमतेचे दोन द्रव्यरूप वैद्यकीय प्राणवायूसाठा केंद्र उभारण्यात येत आहेत.