Join us

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी महापालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:05 AM

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेला यश येत आहे. मात्र, ...

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेला यश येत आहे. मात्र, आता पुन्हा तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असल्याने तिला थोपविण्यासाठी सेरो सर्वेक्षणावर भर दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेद्वारे विविध स्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे.

१५ जुलैपासून सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लहान मुलांना वगळता उर्वरित वयोगटातील सर्वेक्षण करण्यात येईल आणि या सर्वेक्षणात संबंधितांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत ? याचा शोध घेतला जाईल. तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी हे काम केले जाणार आहे. मुंबईतल्या सर्व २४ विभागात सर्वेक्षण केले जाईल. नुकतेच लहान मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात १ ते १८ वयोगटातील लोकांमध्ये ५१.१८ टक्के अँटिबॉडीज विकसित झाल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिकेकडून एप्रिल महिन्यातदेखील सेरो सर्वेक्षणाचे निष्कर्ष मांडण्यात आले होते. त्यानुसार, ३६.३० टक्के नागरिकांमध्ये सकारात्मकता आढळली होती. सर्व विभागात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्त नमुन्यांचे प्रतिपिंड विषयक सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. बिगर झोपडपट्टी परिसरांमधून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यांमधील सेरो सकारात्मकतेच्या टक्केवारीत वाढ, तर झोपडपट्टी परिसरांमधील टक्केवारीत घट नोंदविण्यात आली होती.

सेरो सर्वेक्षण : ठळक पध्दती

- जुलै २०२०मध्ये सेरो चाचणी सर्वेक्षण तीन विभागात करण्यात आली होती.

- ऑगस्ट २०२०मध्ये सेरो सर्वेक्षण हे त्याच तीन विभागात करण्यात आले होते.

- मार्च २०२१मध्ये सर्व २४ विभागांत सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते.

- संक्रमणाचे प्राबल्य समजून घेण्यासाठी सेरो सर्वेक्षण करण्यात येते.

यापूर्वी काय केले होते ?

- महापालिका क्षेत्रातील दवाखान्यांद्वारे जमा करण्यात आलेल्या रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

- खासगी वैद्यकीय प्रयोगशाळाकडे उपलब्ध असलेल्या रक्तनमुनेसुद्धा यांचा समावेश होता.

- ज्यांचे लसीकरण झाले नाही, अशा व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची चाचणी सर्वेक्षणात करण्यात आली.

- रक्त नमुन्यांची प्रतिपिंडविषयक चाचणी कस्तुरबा रुग्णालय परिसरात असणाऱ्या प्रयोगशाळेत करण्यात आली.

कोणती माहिती प्राप्त होते ?

- सामुदायिक संसर्ग पडताळण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या सूचनेनुसार महापालिकेने व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू केले.

- संक्रमणाचा कल समजून घेण्याकरिता मुंबईत गेल्या वर्षी २५ मे रोजीच्या आसपास राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण सुरू झाले.

- संक्रमणाची बाधा होणे, संक्रमणाचा प्रसार जनतेमध्ये कशा रितीने झाला, याबद्दलची माहिती यात प्राप्त होते.