कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिका सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:08 AM2021-01-16T04:08:57+5:302021-01-16T04:08:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनारूपी संकटाला हद्दपार करण्यासाठी येणाऱ्या कोविशिल्ड लसीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील नऊ लसीकरण ...

Municipal ready to deport Corona | कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिका सज्ज

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिका सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनारूपी संकटाला हद्दपार करण्यासाठी येणाऱ्या कोविशिल्ड लसीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील नऊ लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवकांना लस देण्याची मोहीम शनिवारपासून सुरू होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील कोविड सुविधा केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात होईल. त्यानंतर दररोज सरासरी चार हजार जणांना लस देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस बुधवारी मुंबईत आणण्यात आली. परळ येथील एफ दक्षिण कार्यालयात एक लाख ३९ हजार ५०० लस ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या लसींचा साठा दुपारी दोन वाजता नऊ केंद्रांवर रवाना करण्यात आला. देशव्यापी लसीकरणाच्या आरंभाचा एक भाग म्हणून विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी माेहिमेचा आरंभ करणार आहेत.

नऊ लसीकरण केंद्रांवर एकूण ४० बूथ असतील. या सर्व बूथवर मिळून सुरुवातीला दररोज सरासरी चार हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी उदा. स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षांखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब आदी) असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून यासाठी एका ॲपद्वारे लघुसंदेश संबंधित व्यक्तींना जाईल.

* येथे आहेत लसीकरण केंद्र

परळ येथील केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर.एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा, सांताक्रूझचे व्ही.एन. देसाई, घाटकोपरचे राजावाडी आणि कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्र या सर्व केंद्रांमध्ये एकूण ४० लसीकरण बूथ असणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण अपेक्षित असल्यामुळे आणखी ६३ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील. त्या वेळी दररोज सुमारे ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता असेल.

* पहिल्या टप्प्यात एक लाख २५ हजार आरोग्य सेवकांना लस

सुमारे ३० ते ३५ लाख लोकसंख्येला लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी सात हजार १२६ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. दहा हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख २५ हजार आरोग्य सेवकांना लस दिली जाईल. पोर्टलवर आतापर्यंत एक लाख ३२ हजार १४२ जणांची नोंद झाली आहे. प्रत्येक कोविड लसीकरण केंद्रात तात्पुरत्या साठवणुकीसाठी शीतसाखळी उपकरणांचा पुरवठा करण्यात आला आहे.

.....................

Web Title: Municipal ready to deport Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.