मुंबई : कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसींची खरेदी करण्यासाठी महापालिकेने जागतिक निविदा मागविल्या आहेत. मात्र तब्बल एक कोटी लस खरेदी करण्यात येणार असल्याने महापालिकेने काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत. त्यानुसार कार्यादेश दिल्यापासून तीन आठवड्यांच्या आत लसींचा पुरवठा करणे, दोन ते आठ डिग्री सेल्सियस या तापमानात लस साठविण्याची सोय करावी, तर चीनमधील उत्पादकांना प्रवेश बंद असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.लसींचा साठा मर्यादित असल्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यामुळे महापालिकेने आता स्वबळावर लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी जागतिक निविदा मागविण्यात आल्या. १८ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार असून, सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या कंपनीला कार्यादेश देण्यात येणार आहे. तीन आठवड्यांत लसींचा पुरवठा झाल्यास पुढील ६० ते ९० दिवसांमध्ये निम्म्याहून अधिक मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
...म्हणून चिनी कंपन्यांना प्रवेश नाही- ज्या देशांच्या सीमा आपल्या देशाला लागून आहेत, अशा कंपन्यांकडून लस घेण्यात येणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारत आणि चीनमधील सीमावाद ताणला गेला होता. तेव्हा चीनशी असलेले व्यापारी व्यवहार थांबविण्यात आले होते. - तसेच देशातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चिनी कंपन्यांना केंद्रांची परवानगी बंधनकारक करण्यात आली होती. हा वाद चिघळण्यापूर्वी कोस्टल रोडचे टनल बोरिंग मशीनचे सुटे भाग चीनवरून आणण्यात आले होते. या मशीनची जुळणी करण्यासाठी चीनवरून तज्ज्ञ येणार होते. मात्र, सीमावाद चिघळल्यानंतर तेथील तज्ज्ञांच्या मदतीशिवाय महापालिकेने या मशीनची जुळणी केली होती. त्याप्रमाणे आता चीनमधील कंपन्यांना या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यावर निर्बंध असतील, असे पालिका सूत्रांकडून समजते.