महापालिकेचा स्वच्छता पॅटर्न राज्यात राबविणार: मुख्यमंत्री, हरित क्षेत्र वाढवण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:07 AM2023-12-25T06:07:46+5:302023-12-25T06:08:17+5:30
डीप क्लिनिंग मोहिमेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): मुंबई महापालिकेकडून संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) सुरू केली आहे. त्यातून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा स्वच्छता पॅटर्न यशस्वी होत असून हा पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई महानगरातील सर्व रस्ते काँक्रीटकरणाचे होऊन ते खड्डेविरहित होतील, त्या दिशेने कामे सुरू आहेत, असेही त्यांनी नमूद केले. रविवारी शहर विभागातील डीप क्लिनिंग मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले आणि विविध ठिकाणांची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
रविवारी ३ वॉर्डांत झालेल्या डीप क्लिनिंग मोहिमेत मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमुळे वायू प्रदूषण कमी होऊन मुंबई प्रदूषणमुक्त करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारेल. लोकं सदृढ, निरोगी राहतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, रस्त्यांवरील माती काढणे, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणे, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणे ही कामे केली जात आहेत.
एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक चौकात झाडे लावणे, अर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरित क्षेत्र वाढविणे ही कामे केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पुढील अडीच वर्षांत रस्ते खड्डेमुक्त
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून येत्या दोन-अडीच वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे होऊन मुंबईतील रस्त्यांवरून खड्डेविरहित प्रवास व्हावा, या दिशेने कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय मुंबईत विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. रस्ते दुभाजकांमध्ये तसेच चौक, वाहतूक बेटं आणि शक्य असेल त्या मोकळ्या जागांवर रोपं, झाडे लागवड करणे, हिरवळ फुलवणे, हरित पट्टे व नागरी वने तयार करून पर्यावरणपूरक वातावरण तयार करणे, अशा चौफेर पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.