लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये पुढील तीन वर्षांकरिता, निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई स्वच्छता आणि परिचारक मनुष्यबळ पुरविण्यासाठी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्या निविदेतील अटींवरून शिक्षण समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.
सोमवारी पालिका मुख्यालयात झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत या निविदांत विषय उपस्थित झाला. कोणत्याही परिस्थितीत ही निविदा मंजूर करणार नाही, असे शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या मनमानीबद्दल शिक्षण समिती सदस्या शीतल म्हात्रे, शुभदा गुडेक आणि सदस्य साईनाथ दुर्गे यांनी हल्लाबोल चढवला. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रभारी) आशुतोष सलील उपस्थित होते.
शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचा हवाला देत सदर निविदेप्रकरणी पालिका प्रशासनाची भूमिका काय आहे? मंत्री महोदयांनी चौकशी करण्याची मागणी केली असताना, परत येत्या २० तारखेला टेंडर तुम्ही कसले काढता, असा सवाल केला. सदर टेंडर रद्द करण्याची आग्रही मागणी करून अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली. ठरावीक कंत्राटदारांना मदत करण्याच्या हेतूने ही निविदा काढण्यात आल्याचा आरोप आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे.
कोरोना कालावधीत खासगी कंत्राटदारांपेक्षा महापालिका कीटकनाशक विभागाने उत्कृष्ट काम केले आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही याच विभागामार्फत काम होऊ शकते. मग आता निविदेचा घाट का घातला, असा सवाल प्रशासनाला शीतल म्हात्रे यांनी केला.