लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९३.२५ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा ४० टक्क्यांनी वाढले़ ७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई पब्लिक स्कूलमधील संकू संजीवा अंजनेयुलु व विलेपार्ले मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील महेक गांधी यांनी ९६ टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे.महापालिका शाळांचा गेल्या वर्षी ५३.१५ टक्के निकाल लागला होता. यावर्षी दहावीच्या निकालात ४०.१० टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे निकालात २०.६६ टक्क्यांनी घट झाली होती.यंदा महापालिकेच्या अनुदानित व विनाअनुदानित २१८ शाळांमधून १३,६३७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी १२ हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रभादेवी पालिका माध्यमिक शाळेतील हिना अर्जुन तुळसकर हिने ९५.४० टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक, तर सांताक्रुझ पश्चिम, पालिका माध्यमिक उर्दू शाळेतील कुलसूम तारीक या विद्यार्थिनीने ९४.६० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. सांताक्रुझ पश्चिम येथील पालिका माध्यमिक (हिंदी) शाळेतील यादव रूपेश आर याने ९४.४० टक्के गुण मिळवून चौथा, तर चारकोप सेक्टर नं. १ पालिका माध्यमिक शाळेतील (हिंदी) खान सकिना अब्दुल हाय हिने ९४.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.सुरक्षारक्षकाच्या मुलीने मिळवले ९८.८० %मुंबईतील भांडुपच्या अमरकोर विद्यालयाच्या भाग्यश्री गावडे या विद्यार्थिनीने राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के मिळवून यश मिळविले. आई, वडील, मोठा भाऊ असणाऱ्या भाग्यश्रीने हलाखीच्या परिस्थितीत हे यश मिळविल्याने तिचे कौतुक होत आहे. भाग्यश्रीचे वडील सारस्वत बँकेमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. दहावीच्या यशानंतर ते खूप आनंदी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. भविष्यात वाणिज्य शाखा घेऊन प्राध्यापक व्हायचे तिचे स्वप्न आहे़
महापालिका शाळांचा निकाल ९३.२५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 4:10 AM