मुंबई : देशातील सर्वोत्तम १० शासकीय शाळांच्या क्रमवारीत मुंबईतील वरळी सीफेस या महापाालिकेच्या शाळेने क्रमांक पटकावला. असे स्थान पटकावणारी राज्यातील व देशातील ती पहिलीच पालिका शाळा ठरली आहे. तिरुअनंतपुरम येथील केंद्रीय विद्यालय, नवी दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय आणि आयआयटी मद्रासच्या केंद्रीय विद्यालयाने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे.
वरळी सीफेस एमपीएस शाळेच्या इमारतीप्रमाणेच शाळेमधील विद्यार्थ्यांसाठीच्या भौतिक सुविधा, सहशालेय उपक्रम गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावणारे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे यश संपूर्ण शिक्षण विभागाचे असल्याचे त्यांनी म्हटले. तर, राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या शाळेचे तसेच मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.
एका शाळेला देशपातळीवर शिक्षण संस्थांमध्ये आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. याचाच आदर्श ठेवून यापुढील वाटचाल करत इतर पालिका शाळांमध्येही हा दर्जा आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. - महेश पालकर, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षण विभाग