पालिका शाळांचे विलीनीकरण रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:28 AM2018-03-29T02:28:38+5:302018-03-29T02:28:38+5:30
विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिकेच्या आठ शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव, शिक्षण समितीच्या बैठकीत
मुंबई : विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिकेच्या आठ शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव, शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजुरीसाठी प्रशासनाने आणला होता. मात्र, या शाळांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून, त्यानंतरच आवश्यकतेनुसार शाळा विलीनीकरणाचे प्रस्ताव आणावेत, अशी ताकीद देत शिक्षण समितीने हे प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविले आहेत.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक साहित्य, व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब हे असेच काही उपक्रम यासाठी सुरू आहेत. मात्र, एकीकडे पटसंख्या वाढविण्यासाठी करोडो रुपये खर्च करून हे प्रयत्न सुरू असताना, शिक्षण विभागाकडून शाळांच्या विलीनीकरणाचे प्रस्ताव मांडण्यात येत आहेत, पण विलीनीकरणाच्या नावाखाली पालिका शाळा बंद पाडण्याचा हा घाट असल्याची नाराजी शिक्षण समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या ३५ अशा शाळा चालविण्यासाठी खासगी संस्थांकडे सुपुर्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. अनेक ठिकाणी शाळांची जागा विकासकांच्या घशात घालण्यासाठी शाळा बंद करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करावा, कोणत्या उपाययोजना करता येतील का, ते तपासून प्रयत्न करावेत, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुढेकर यांनी दिले.