लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पालिका शाळांचा ऑनलाईन प्रवेशोत्सव १४ जून रोजी पार पडला आणि शिक्षकांकडून, पालिका अधिकाऱ्यांकडून पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन शिक्षणाच्या पहिल्याच दिवशी पालिका शिक्षकांकडून पुढील २ महिने विद्यार्थ्यांची कशाप्रकारे मागील वर्षीच्या महत्त्वाच्या, न समजलेल्या घटकांची उजळणी घेण्यात येईल आणि १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात येईल, याचा आराखडा समजावण्यात आल्याची माहिती पालिका शाळांचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. प्रत्यक्षातील प्रवेशोत्सवासारखाच ऑनलाईन प्रवेशोत्सवाचा विद्यार्थी, पालकांचा उत्साह आणि उपस्थिती प्रतिसाद चांगला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.
पालिकेच्या नवीन शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात शाळा उघडायला आणखीन थोडा वेळ लागणार असला तरी अभ्यासात खंड पडणार नाही, शिक्षकांच्या घरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन शिक्षण सुरु राहणार असल्याची माहिती पालकर यांनी दिली. या दरम्यान विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वह्यादेखील पुरविल्या जाणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके ई-बालभारतीवरून विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून घेण्यासाठी माहिती देण्यात आली असून, प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यानंतर त्यांना पुस्तके पुरवली जाणार असल्याची माहिती पालकर यांनी दिली. त्याचप्रमाणे पालिकेमार्फत ज्या २७ शालेय वस्तूंचे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते ते प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्या सर्व वस्तू शालेय स्तरावर पोहोचल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढील २ महिन्यात ऑनलाईन शिक्षणात मागील वर्षात ऑनलाईन शिक्षणातील अडचणी, समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, तशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार असल्या तरी जेव्हा पालिका प्रशासनामार्फत त्या प्रत्यक्षात सुरु करण्याचे निर्देश देण्यात येतील, तेव्हा पुन्हा एकदा शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असताना अनेक शाळा विलगीकरणासाठी वापरल्या तसेच अनेक महिन्यांपासून शाळा सुरु करण्याचे नियोजन होत आहे. त्यामुळे वारंवार नेमाने पालिका शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होतच असल्याची माहिती त्यांनी दिली.
गरीब विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी संस्थांची मदत घेणार
पालिका शाळेतील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल घटकांतून येत असल्याने आता लॉकडाऊन काळात त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशा काळात ज्याप्रमाणे मागील वर्षी पालिका शिक्षण विभागाने काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्स, डेटा पॅक यांची मदत केली होती, तशीच ती यंदाही करण्याचे प्रयत्न असणार आहेत, अशी माहिती पालकर यांनी दिली. याशिवाय पालिकेच्या यू ट्यूब चॅनेलवरील अभ्यासक्रमाचे विविध भाषांतील व्हिडीओ कायम उपलब्ध राहणार असल्याने विद्यार्थी केव्हाही, कुठेही त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.