लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिका शाळांचा चेहरामोहरा बदलत असून विद्यार्थ्यांना ३६० डिग्री सर्वांगीण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत असून एसएससी, सीबीएससी, आयसीएसई बोर्डाचे शिक्षण सुरू केले आहे. आगामी काळात केम्ब्रिज विद्यापीठाशी करार करून पालिका विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंग्लंडप्रमाणे महापालिकेच्या शाळा ग्रामर स्कूल करणार, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. दिंडोशीमधील डायलिसिस केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०१३ साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका शाळा हायटेक करून येथील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २०१७ साली ९० माध्यमिक शाळा व्हर्च्युअल केल्या. पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना टॅब दिले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुसज्ज प्रयोगशाळा, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, कँटीन, चांगले शौचालय आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या.
यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू, मुंबईचे उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महिला विभाग संघटक व नगरसेविका साधना माने, शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी, पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष संगीता सुतार, प्रभाग क्रमांक ४१ चे स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष प्रतिमा खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डायलिसिस केंद्राचे लोकार्पण
चार ते पाच लाख लोकसंख्या असलेल्या मालाड पूर्व भागात माफक दरात डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिवसेनेने दिलेले होते. त्यानुसार दिंडोशीमधील त्रिवेणीनगरमधील दिव्या अपार्टमेंटमध्ये रुग्णांसाठी मुंबई महापालिकेच्या वतीने डायलिसिस केंद्र उभारले आहे. लाइफलाइन मेडिकेअर हॉस्पिटल संचालित, स्व. माँ मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसिस केंद्रात सध्या १० डायलिसिस मशीन उपलब्ध करण्यात आल्या असून, पुढील कालावधीत ६ डायलिसिस मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत. या डायलिसिस केंद्राचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
फोटो आहे - अँकर फोटो
फोटो ओळ - त्रिवेणीनगर येथील डायलिसिस केंद्राचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.