महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे- सुरेश काकाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:58 AM2020-03-02T00:58:02+5:302020-03-02T00:58:10+5:30

बदलत्या काळानुसार समस्या व आपत्तींचा अभ्यास करून, त्यामध्ये संशोधन करून नवीन उपाययोजना आत्मसात करणे गरजेचे आहे.

Municipal security team should adopt the latest technology - Suresh Kakani | महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे- सुरेश काकाणी

महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे- सुरेश काकाणी

Next

मुंबई : बदलत्या काळानुसार समस्या व आपत्तींचा अभ्यास करून, त्यामध्ये संशोधन करून नवीन उपाययोजना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेता येईल. महानगरपालिका सुरक्षा दल मोलाची कामगिरी बजावत आहे़ अत्याधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान यांचा अवलंब करून दलाने अधिकाधिक सक्षम व्हावे, असे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले.
महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा ५४वा वर्धापन दिन व पारितोषिक वितरण समारंभ सुरेश काकाणी यांच्या हस्ते भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
सुरेश काकाणी म्हणाले, सुरक्षा दलाची स्थापना १९६६ मध्ये झाली. त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. महानगरपालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करणे, विविध प्रसंगी संरक्षण, मदत, बचाव कामे करणे ही कर्तव्ये सुरक्षा दलाने सक्षमपणे पार पाडली आहेत़ नवतंत्रज्ञान वापरात आणले, तर मनुष्यबळाच्या समस्येवरदेखील मात करता येते. या सर्वांसोबत महत्त्वाचे म्हणजे लोकसहभाग प्राप्त करण्यासाठी माहिती व संवाद यांचे जाळे विकसित होणे गरजेचे आहे. सुरक्षा दलातील रिक्त पदांबाबत प्रशासन योग्य तो व सकारात्मक विचार करेल.
प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर म्हणाले, सुरक्षा दलाने सीसीटीव्ही, डीएफएमडी, एचएमडी, एक्स-रे संयंत्र, तसेच अभ्यागत प्रवेश प्रणाली या माध्यमातून सुरक्षा अधिक सतर्क केली आहे. सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांना आपत्ती निवारण आणि प्रतिबंध प्रशिक्षण देण्यात येत आहे. भांडुप संकुल प्रशिक्षण केंद्रात सुरक्षा जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते. लवकरच सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना एक वर्षाचा अग्नी व सुरक्षाविषयक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Municipal security team should adopt the latest technology - Suresh Kakani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.