Join us

CoronaVirus News: पालिका शिक्षक कोरोना संसर्गाच्या भीतीच्या छायेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 1:01 AM

पोषण आहार, क्रमिक पुस्तकांचे वाटप : पालक, विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याआधी पूर्वतयारी करण्यासाठी स्थानिक परिस्थिती पाहून शिक्षकांना शाळेच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर अनेक शिक्षकांना शालेय पोषण आहाराचे वाटप, पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची कामे दिली आहेत. या सगळ्यात मुंबईच्या संजयनगर येथील उच्च प्राथमिक हिंदी शाळेतील एका शिक्षिकेच्या घरातील नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती मिळाली आहे. या शिक्षिकेच्या संपर्कात १५ , १६ आणि १७ जून दरम्यान अनेक पालक, विद्यार्थी व सहकारी शिक्षक आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे त्या शिक्षकेसह इतर सहकारी शिक्षक व पालक घाबरले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.मुंबई रेड झोनमध्ये येत असताना शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचा अट्टहास का? कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी आता शिक्षकांना हाताशी धरणार का? यामुळे शिक्षकांचे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांचेच आरोग्य धोक्यात घातले जात आहे, असा आरोप दराडे यांनी केला आहे. वाहतुकीची साधने, रेल्वे उपलब्ध नसल्याने वसई, विरार, बदलापूर, ठाणे, टिटवाळा अशा ठिकाणांहून मुंबईत येताना सुरक्षितता धोक्यात येत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होईपर्यंत शिक्षकांना शाळांमध्ये येण्याची सक्ती करू नये, गावाहून येणाºया शिक्षकांनाही आणखी १५ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी दराडे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे केली आहे.आॅनलाइन शिक्षण चालू आहे. अशा वेळेस शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाज करण्याचा आग्रह करू नये. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने जोपर्यंत कोरोनाच्या प्रसारास आळा बसत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणे धोकादायक आहे. सरकारचे पावसाळी अधिवेशनही आॅगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. मग नववी-दहावीच्या मुलांच्या शाळा सुरू करण्याचा अट्टहास शिक्षण विभाग का करत आहे? असा सवाल हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी विचारला आहे.अतिरिक्त आयुक्तांनी दिली वर्क फ्रॉम होमची परवानगीआमदार कपिल पाटील यांनी पालिका शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलिल यांची भेट घेतली असून, मुंबई मनपातील खासगी शाळांसह सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्याचे मान्य केले आहे. तसेच १५, १६ व १७ जून रोजी हजर न राहू शकलेल्या शिक्षकांची पगार कपात होणार नाही, असे स्पष्ट केले असल्याची माहिती शिक्षकभारतीचे सुभाष मोरे यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या