मुंबई : गेल्या दोन आठवड्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. हीच स्थिती पुढील दोन ते तीन महिने कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे हा प्रसार रोखण्यासाठी मंगळवारपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवक उद्यापासून घरोघरी जाऊन प्रत्येक मुंबईकराचे तापमान आणि प्राणवायूची पातळी तपासणार आहेत.गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईकर कोरोनारूपी संकटाचा सामना करीत आहेत. कोरोनावर प्रभावी उपाय ठरणारी लस बाजारात येईपर्यंत मुंबईकरांना स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक तसेच कार्यालय व बाजारात जाताना मुंबईकरांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत महापालिका मार्गदर्शन करणार आहे. या मोहिमेसाठी पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका विशेष बैठकीत घेतला.ही मोहीम नव्हे लोकचळवळही मोहीम केवळ मोहीम न राहता एक लोकचळवळ व्हावी. या लोकचळवळीत प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांना या बैठकीत केली. वारंवार साबणाने हात धुणे आणि दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरचे सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसूत्रीसह विविध मार्गदर्शक सूचनांचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे समावेश होण्यासाठी थेट संपर्क साधून जनजागृती करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अशी आहे मोहीममहापालिकेचा एक कर्मचारी व दोन स्वयंसेवक, प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून त्यांची कोविडबाबत प्राथमिक पडताळणी करणार आहेत.यासाठी या चमूकडे एक तापमापक (थर्मामीटर), शरीरातील प्राणवायू प्रमाणाची पडताळणी करणारे यंत्र (आॅक्सिमीटर) आणि एक नोंदवही असेल.यामध्ये प्रामुख्याने वय, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधींचा तपशील (कोमॉबीर्डीटी), शरीराचे तापमान, प्राणवायूची पातळी नोंदविली जाईलया नोंदवहीत प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदविली जाईल.मुंबईकरांचे मार्गदर्शनकोविड प्रतिबंधासाठी प्रत्येक कुटुंबाने आपापल्या स्तरावर काय काळजी घ्यावी, याबाबत हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला मार्गदर्शन करतील. या मोहिमेत आपले योगदान देणाºया प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने चमूतील प्रत्येकाला प्रशिक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
पालिकेचे स्वयंसेवक आजपासून घरोघरी तपासणार तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 7:28 AM