Join us  

रेल्वेच्या नालेसफाईवर महापालिकेचा वॉच

By admin | Published: May 24, 2016 3:15 AM

रेल्वेच्या हद्दीतील छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेकडून करोडो रुपयांचा निधी घेतल्यानंतरही प्रत्येक पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे़ यासाठी पालिकेलाही

मुंबई : रेल्वेच्या हद्दीतील छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेकडून करोडो रुपयांचा निधी घेतल्यानंतरही प्रत्येक पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत होत आहे़ यासाठी पालिकेलाही जबाबदार धरण्यात येत असल्याने यावर्षी रेल्वेचे रुळ पाण्याखाली जाणार नाहीत, याची खबरदारी पालिकेने घेतली आहे़ त्यानुसार या सफाई कामाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी रेल्वे रुळावर उतरले आहेत़ गेल्या वर्षी १९ जून रोजी पहिल्याच पावसात रेल्वे सेवा विस्कळीत झाली़ रेल्वेच्या हद्दीतील नाले व कल्व्हर्ट साफ नसल्याने हार्बर सेवा तब्बल सहा तास ठप्प झाली होती़ तर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवरील सेवांचीही वेगळी अवस्था नव्हती़ मुंबईची जीवन वाहिनी ठप्प झाल्याचा फटका लाखो प्रवाशांना बसला होता़ कल्व्हर्टमधील गाळ काढण्यात न आल्याने रुळ पाण्याखाली गेल्याचे त्यावेळीस दिसून आले होते़ यंदा पश्चिम आणि मध्य रेल्वे प्राधिकरणाच्या हद्दीतील छोटे नाले आणि क्लव्हर्टच्या सफाईसाठी ३० मे पर्यंतची मुदत पालिकेने दिली आहे़ या सफाईच्या कामासाठी पालिकेने रेल्वेला चार कोटी रुपये दिले आहेत़ मात्र या सफाईबद्दल वारंवार विचारणा करुनही रेल्वे प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात येत नाही़ याची गंंभीर दखल घेऊन उप प्रमुख अभियंता आणि विभागातील अधिकाऱ्यांना काम करुन घेण्याची सुचना प्रशासनाने केली आहे़ (प्रतिनिधी)रेल्वे दाद देईना़़.गेल्या महिन्यात पालिकेने रेल्वे प्राधिकरणाबरोबर बैठक घेऊन कल्व्हर्टच्या सफाईचा अहवाल मागितला होता़ मात्र रेल्वे प्रशासनाने कोणतीच दाद दिली नाही़ या कामांची मुदत संपत आल्यामुळे रेल्वेला पुन्हा एकदा स्मरण करुन देण्यात येणार असल्याचे, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़रेल्वेच्या हद्दीत ४० कल्व्हर्ट आहेत़ प्रत्येक वर्षी या कल्व्हर्ट व नाल्यांच्या सफाईसाठी पालिका करोडो रुपयांचा निधी देत असते़ कुर्ला, चुन्नाभट्टी, परळ, एलफिस्टन, ग्रँटरोड अशा ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली जात असतात़ काँग्रेस कार्यकर्ते आपापल्या विभागातील गाळाने भरलेल्या नाल्यांचे फोटो काढून पालिकेच्या महासभेत सादर करणार आहेत़