Join us  

पाण्याच्या उधळपट्टीवर महापालिकेचा वॉच

By admin | Published: June 23, 2014 2:42 AM

यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरात आतापासूनच पाणी कपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

नवी मुंबई : यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरात आतापासूनच पाणी कपातीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असले तरी नवी मुंबईत मात्र पाण्याची मोठ्याप्रमाणात उधळपट्टी सुरू असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून पाण्याच्या उधळपट्टीवर विशेष वॉच ठेवला जात आहे.नवी मुंबईत चोवीस तास पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातून हा पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असल्याने त्याचा वारेमाप वापर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गाड्या धुण्यासाठी व उद्यानासाठी याच पाण्याचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. अनेकदा पाइप लावून गाड्या धुतल्या जातात. अनधिकृत बांधकामांसाठी सुध्दा या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी होत आहे. एमआयडीसी क्षेत्रात मुख्य जलवाहिन्या फोडून पाण्याची चोरी केली जात आहे. फोडलेल्या या जलवाहिनीतून दरदिवशी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यातच यंदा पाऊस कमी प्रमाणात पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याच्या स्वैर वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या मोरबे धरणात आणखी काही महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुढील महिनाभरात धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांवर सध्या तरी पाणीटंचाईचे सावट नाही. असे असले तरी महिनाभरानंतर पावसाचा अंदाज घेवून धोरण निश्चित केले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)