Join us  

महापालिकेचा पाणीबचतीचा फंडा

By admin | Published: May 01, 2016 3:25 AM

गेल्या आॅगस्टपासून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात हेच महापालिकेचे पाणीबचतीचे प्रमुख नियोजऩ त्यामुळे दररोज सरासरी पाचशे दशलक्ष लीटर पाण्याची बचत होत आहे़ त्याचवेळी गळती

- शेफाली परब-पंडितगेल्या आॅगस्टपासून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात हेच महापालिकेचे पाणीबचतीचे प्रमुख नियोजऩ त्यामुळे दररोज सरासरी पाचशे दशलक्ष लीटर पाण्याची बचत होत आहे़ त्याचवेळी गळती आणि चोरीच्या माध्यमातून मात्र दररोज सुमारे ७०० ते ९०० दशलक्ष लीटर पाणी वाया जात आहे़ परिणामी पाणीबचतीसाठी योजिलेली महापालिकेची योजना फोल ठरत आहे़गेल्या काही वर्षांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मुंबईकरांना जाणवत आहे़ त्यातच गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसाने तर पालिकेची भंबेरीच उडवली आहे़ ऐन पावसाळ्यातच पाणीबचतीसाठी कपात करण्याची वेळ पालिकेवर आली़ याव्यतिरिक्त गेली अनेक वर्षे पाणीबचतीबाबत उदासीन असलेल्या महापालिकेला या वर्षी एकदम खडबडून जाग आली आहे़ एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला असल्याने मुंबई महापालिकेचीही आता झोप उडाली आहे़ त्यानुसार दरवर्षीप्रमाणे पाणीबचतीसाठी पालिका सरसावली असून आता शालेय पातळीपासूनच पाणीबचतीचे धडे देत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे़ यासाठी विभागनिहाय शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे़ विद्यार्थ्यांबरोबरच नगरसेवकही आपल्या माध्यमातून पाणीबचतीवर चर्चासत्र आयोजित करीत आहेत़ एवढ्यावरच न थांबता पालिकेने बांधकाम व्यावसायिक, तरणतलाव आणि पाण्याच्या व्यावसायिक वापरावरही निर्बंध आणले आहेत़मुंबई महापालिकेमार्फत दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो़ मात्र मुंबईत पाण्याची दररोजची मागणी ४२०० दशलक्ष लीटर एवढी आहे़ ६५० दशलक्ष लीटर पाण्याचे बाष्पीभवन होते़ २० ते २६ टक्के म्हणजेच सुमारे ७०० ते ८०० दशलक्ष लीटर पाण्याची गळती व चोरी होते़ छपरावरून गळणारे पावसाचे पाणी मोठ्या टाकीमध्ये साठवून ठेवण्याची व्यवस्था रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे करता येते़ हा प्रकल्प आॅक्टोबर २००२ मध्ये सक्तीचा करण्यात आला़ त्यानुसार एक हजार चौरस मीटर जागेत असलेल्या नव्या इमारतींमध्ये या प्रकल्पाची व्यवस्था ठेवणे बंधनकारक करण्यात आले़ त्यानुसार रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था नसलेल्या नव्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाकारण्याची अट टाकण्यात आली़ औद्योगिक वसाहती, झोपडपट्ट्या व निवासी वसाहतींमधून दररोज २६०० दशलक्ष लीटर सांडपाणी तयार होत असते़ यापैकी १६०० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून समुद्रात सोडून देण्यात येते़ परदेशात पुनर्प्रक्रिया केलेले पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते़ मुंबईत हे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरले गेल्यास लाखो लीटर पाण्याची बचत होईल़ या उद्देशाने घाटकोपर, कुलाबा, वरळी, वर्सोवा, भांडुप, वांद्रे आणि मालाड या ठिकाणी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला़ सार्वजनिक खासगी भागीदारीवर हे प्रकल्प उभे राहणार आहेत़ उद्यानांमध्ये पाणी वापरावर निर्बंधअपुऱ्या जलसाठ्यामुळे पालिकेच्या सर्व उद्याने व बंगल्यांमधील झाडे जगविण्यासाठी आवश्यकतेनुसार कमी पाणी वापरण्याची सक्त ताकीद पालिकेने आपल्या कामगारांना दिली आहे़ उद्यानांमध्ये पाण्याची नासाडी केल्यास त्या उद्यानाची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार आहे़ पालिकेच्या सहा सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये दररोज ५.५५ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. या पाण्याचा उद्याने, मोठी मैदाने, कारखाने अशा ठिकाणी वापर होऊ शकतो. महालक्ष्मी रेसकोर्स आणि वेलिंग्टन क्लब येथे तेथील संस्था पाणी खरेदी करीत आहेत. प्रत्येक किलो लीटरसाठी दहा रुपये दराने पाण्याची विक्री या संस्थांना करण्यात येत आहे. उर्वरित तीन ते चार दशलक्ष लीटर पाणी ग्राहक मिळत नसल्यामुळे समुद्रात सोडून देण्यात येत आहे़गळती रोखण्याचा प्रयोग२०१४ मध्ये चार हजार ८९५ बेकायदा कनेक्शन आणि ४० हजार ठिकाणी पाण्याची गळती रोखण्यात आली़ गेल्या सप्टेंबर महिन्यापासून ३३९४ पाण्याचे बेकायदा कनेक्शन, १३ हजार ५१५ पाण्याची गळती रोखण्यात आली आहे़ सप्टेंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणीचोरी करणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जानेवारी ते डिसेंबर २०१५ पर्यंत ३९ हजार ९६७ पाण्याची गळती आणि ५६४४ बेकायदा कनेक्शनवर पालिकेने कारवाई केली आहे़