मुंबई : आयआयटी मुंबई आणि त्याचे संकुल म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य आणि शांततापूर्ण वातावरण असणारी जागा, मात्र गेल्या काही महिन्यांपासून येथील विद्यार्थ्यांच्या शांततेचा भंग होत असल्याचे समोर येत आहे. आयआयटी मुंबईच्या पवई संकुलातील हॉस्टेल ३, ४, ६ आणि १८ मधील विद्यार्थी मागील काही काळापासून ७५ ते ८० डेसिबलपर्यंतच्या आवाजाची नोंद आपल्या खोलीत करीत आहेत. एच - १८ मधील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही या त्रासाचा सामना करावा लागत आहे.विशेष म्हणजे आवाजाची पातळी ५५ - ६० डेसिबलच्या वर गेल्यास त्रास होतो. येथे तर त्याहून अधिक आवाजाची नोंद केली जात आहे. हा आवाज संकुलाजवळील महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाइपलाइन दुरुस्तीचा असून यामुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही अद्याप पालिका प्रशासनाकडून काहीच कारवाई केली जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.संकुलाच्या जवळील पाइपलाइनच्या या कामाचा त्रास दिवसातून २ वेळा म्हणजे रात्री १० आणि सकाळी ४ वाजता सर्वांत जास्त होतो. त्यामुळे आम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि प्लेसमेंट्सच्या तयारीवरही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.संकुलातील पाण्याचा पंप नादुरुस्त असून त्याच्या दुरुस्तीचे काम गेला महिनाभर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी इस्टेट आॅफिस आणि हॉस्टेल कौन्सिलशी संपर्क साधून आवाजाच्या त्रासाबद्दल कार्यवाही करण्याची मागणी केली. तेव्हा तेथील इस्टेट आॅफिसमधील कनिष्ठ अभियंते पंकज भोसले यांनी अनेकदा यासंदर्भात पालिका कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांना लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यास संगितल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी पालिकेतील संबंधित अधिकारी सुनील माने यांच्याशी संपर्क साधला असता २ ते ३ दिवसांत ही समस्या सोडवू, असे सांगण्यात आले; मात्र महिना झाला तरी अद्याप समस्या जैसे थे असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे़काम लवकर पूर्ण करण्याची मागणीयाआधीही पवईमधील आयआयटी संकुलातून जाणाºया पालिकेची मोठी जलवाहिनी फुटून विद्यार्थी आणि आसपासच्या रहिवाशांना त्रासाचा सामना करावा लागला होता. सध्या अनेक विद्यार्थी प्लेसमेंटच्या तयारीत असून शेवटच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारीही सुरू झाली आहे. अशात पालिकेच्या पाइपलाइन दुरुस्ती कामामुळे वाढलेला आवाज विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
पालिकेच्या कामामुळे आयआयटी मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढले, विद्यार्थ्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 1:54 AM