Join us

बेलासिस पुलाच्या जोड रस्त्यासाठी पालिकेचे काम सुरू, मनपाची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:44 AM

मुंबई सेंट्रल ते ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रस्ते.

मुंबई : दक्षिण मुंबईतील १२७ वर्षे जुना बेलासिस पूल पाडून नवा पूल उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे रेल्वे हद्दीतील पुलापर्यंत असणाऱ्या जोड रस्त्यांचे काम करण्यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई सेंट्रल ते ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानक दरम्यान हे पोहोच रस्ते बांधले जाणार असून, एप्रिलमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिकेकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. काही वर्षांपूर्वी आयआयटी मुंबई आणि रेल्वे यांच्या संयुक्त पथकाने शहरातील पुलांची संरचनात्मक तपासणी केली होती, तेव्हा हा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता. यामुळे तात्पुरती देखभाल केल्यानंतर शहरातील वाढती वाहन संख्या लक्षात घेता या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुलासाठी ९० ते १०० कोटींचा खर्च अपेक्षित  -

शहरातील आयुर्मान पूर्ण झालेल्या ब्रिटिश बनावटीच्या एका अंडरपाससह १० रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीसाठी ‘महारेल’ची नियुक्त केली होती. 

पुनर्बांधणीनंतर सहा मार्गिका -

पुनर्बांधणीनंतर नवा पूल सहा मार्गिकांचा असणार आहे. नव्या पुलाची उंची रेल्वे रूळांपासून साडेसहा मीटर उंच असणार आहे. सध्या पुलाची उंची पाच मीटर आहे.

सध्या पुलासाठी ९० ते १०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. त्यानुसार रेल्वे आणि महापालिकेने स्वतंत्र निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वे यांच्यात झालेल्या बैठकीत रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे आणि पालिका हद्दीतील काम महापालिकेने करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पालिकेकडून पुलाच्या जाेड रस्त्याची उभारणी -

१) या पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात येणार आहे. 

२) पुलाच्या जोड रस्त्याची उभारणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. ३) यापूर्वीच रेल्वेकडून यासाठी निविदा राबविण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका