महाराष्ट्र महापौर परिषदेच्या २२व्या ऑनलाइन सभेत व्यक्त केला विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची पहिली व दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी दिवसरात्र मेहनत केली. आता तिसऱ्या लाटेसाठी राज्यातील सर्व महापालिका सज्ज असल्याची ग्वाही गुरुवारी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या २२व्या ऑनलाइन सभेत उपस्थित महापौरांनी दिली.
अंधेरी पश्चिम येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयातून महाराष्ट्र महापौर परिषदेचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी या ऑनलाइन सभेचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्ष व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही महापौर परिषद झाली. रणजित चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षीय भाषणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेल्या दीड वर्षांत मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि विद्यमान आयुक्त इक्बाल सिंग चहल तसेच सर्व डॉक्टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्राचे विद्यार्थी यांचे कोरोना नियंत्रणात मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर राज्यातून मुंबईत येणाऱ्या महापौरांसाठी राहण्याची सुविधा नसल्याने मुंबईत महापौर भवन बांधण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, गेली दीड वर्षे राज्यातील सर्व महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइन होत आहेत. आता आपण काळजी घेत कोरोनाला सामोरे जात आहोत. त्यामुळे आता राज्यातील सर्व महापालिकेच्या सर्वसाधारण सभा ऑफलाइन होण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेत ठराव करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. त्याला अनेक महापौरांनी अनुमोदन दिले.
कोरोना काळात राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने विकासाची कामे ठप्प आहेत. त्यामुळे महापालिकांना एमएमआरडीए आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठी आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली.
या सभेत अनेक महापौरांनी मुबलक प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली.
या महापौर परिषदेत मीरा-भाईदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, उल्हासनगरच्या महापौर लीला आशान, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, पिपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यत्रम, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, अकोलाच्या महापौर अर्चना मसने, अमरावतीचे महापौर चेतन गावडे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी चर्चेत भाग घेतला. तर महाराष्ट्र महापौर परिषदेचे समन्वयक आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे मानद संचालक लक्ष्मणराव लटके यांनी आभार प्रदर्शन करताना आजच्या सभेचा वृत्तांत आणि ठराव शासनाकडे पाठवण्यात येतील असे सांगितले.