प्राण्यांच्या नोंदणीसाठी पालिका जाणार घरोघरी, पालिकेचे सर्वेक्षण
By सीमा महांगडे | Updated: February 19, 2024 20:51 IST2024-02-19T20:51:41+5:302024-02-19T20:51:49+5:30
पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करणार

प्राण्यांच्या नोंदणीसाठी पालिका जाणार घरोघरी, पालिकेचे सर्वेक्षण
मुंबई: पालिकेने यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रा. लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्या वतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे मुंबईतील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.
प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने 'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच निरंतर अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांची देखील नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे
भटक्या कुत्र्यानंतर आता पाळीव प्राणी
मुंबई शहरातील पाळीव प्राण्यांच्या लोकसंख्येबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण करत आहोत. यामध्ये प्राण्यांचे आरोग्य, लसीकरण स्थिती आणि नोंदणी याविषयी तपशील समाविष्ट असेल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे प्रतिनिधी प्रत्येक सोसायटीला भेट देणार असल्याची माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.
मुंबईकरांचा सहभाग महत्त्वाचा!
पाळीव प्राण्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईकरांनी देखील पालिकेला मदत करावी. त्यासाठी या लिंकवर https://www.pets-survey.org/bm आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात पालिकेकडून आहे. https://www.pets-survey.org/bm