मुंबई : प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी रस्ते धुणे, स्मॉग गनचा वापर करणे, पाण्याचे फवारे उडवणारी यंत्रणा बसवणे, असे विविध उपाय मुंबई महापालिकेने सुरू केले आहेत. त्याहीपुढे जाऊन आता एकूणच नैसर्गिक संपदा अर्थात शहरातील हिरवळ वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
फक्त सार्वजनिक ठिकाणी किंवा मोकळ्या जागेवरच हिरवळ न वाढवता सोसायट्या, खासगी इमारतींची गच्ची, किचन गार्डनिंग, मियावाकी वृक्षलागवड, व्हर्टिकल गार्डनिंग अशा पद्धतीची निसर्ग संपदा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. पालिकेने नुकताच पुष्पोत्सव आयोजित केला होता. या पुष्पोत्सवास दीड लाख लोकांनी भेट दिली होती. या माध्यमातून निसर्गसंपदा वाढण्यासाठी जनसहभाग घेण्याचे प्रयत्न आहेत.
उद्यापासून सुरू होणाऱ्या उद्यान विद्या कार्यशाळेत विविध विषयांवर प्राध्यापक, तज्ज्ञ मंडळी आपले अनुभव मांडतील. ही कार्यशाळा ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबईतील नागरिकांमध्ये झाडांचे, पर्यावरणाचे महत्त्व व जागरूकता निर्माण करणे तसेच इच्छुक नागरिकांना या कार्यशाळेतील विविध विषयांद्वारे मूलभूत शिकवण देणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना पालिकेद्वारे प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या विभागाचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
नोंदणीसाठी संपर्क :
नोंदणीसाठी नागरिक राणीबागेतील कार्यालयात संपर्क करू शकतात अथवा उद्यान खात्याचे अधिकारी सहायक उद्यान अधीक्षक अमित करंदीकर ९३२३१६३६२२ व उद्यान विद्या सहायक प्रतिभा ठाकरे ८६९२०३०६९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.