Join us

दादरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन, राज्यातील पहिलेच स्टेशन असल्याचा पालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 8:26 PM

या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत असेल.

मुंबई- बेस्ट उपक्रम आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने घेतल्यानंतर आता सार्वजनिक वाहनतळांवर, अशा वाहनांच्या चार्जिंगची सोय महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. दादर (पश्चिम) येथे राज्यातील, असे पाहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. याचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

दादर (पश्चिम), प्लाझा चित्रपटगृहानजीक पालिकेच्या सार्वजनिक वाहनतळातील (कोहिनूर) दुसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. येथे पार्किंग व चार्जिंग या दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असलेल्या परिसरांमध्ये असे चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करुन सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करावी, असे निर्देश ठाकरे यांनी यावेळी दिले. 

अशी असेल चार्जिंग सुविधा...- एकावेळी सात इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग शक्य. यापैकी चार जलद चार्जर असून प्रत्येक चार्जरद्वारे साधारणपणे एका तासात एक वाहन, याप्रमाणे एका तासात एकावेळी चार वाहने ‘चार्ज’ करता येऊ शकतात. 

- याव्यतिरिक्त तीन चार्जर हे संथ चार्जर या प्रकारातील आहे. याद्वारे एक वाहन चार्ज करण्यास सहा तासांचा कालावधी लागतो. 

या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट १५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत असेल.

इलेक्ट्रिक वाहनाचा असाही फायदा..इलेक्ट्रिक वाहने अंशतः किंवा पूर्णपणे विद्युत शक्तीवर चालतात. हालचाल करणारे भाग कमी असल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा इंधन खर्च कमी असतो. कमी इंधन वापरतात. त्‍यामुळे पर्यावरणास ते अनुकूल असतात. 

दादरमधील वाहनतळाची सुविधा..दादर (पश्चिम), सार्वजनिक वाहनतळामध्ये  आता दररोज (२४ तासांमध्‍ये) साधारणपणे ७२ इलेक्ट्रिक वाहने चार्ज होऊ शकतात. या वाहनतळामध्ये वाहन धुलाई केंद्र (कार वॉशिंग सेंटर) सुविधादेखील उपलब्ध आहे. या वाहनतळामध्ये वाहन चार्ज करण्‍यासाठी किंवा कार धुवायची वाट पाहत असताना, ड्रायव्हर्स लाऊंजमध्‍ये प्रवासी आराम करू शकतात. या ठिकाणी चहा-नाश्त्याची सुविधा सशुल्क पद्धतीने उपलब्ध आहे.

टॅग्स :वीजेवर चालणारं वाहनमुंबई