Join us

पालिका सफाई कर्मचाऱ्याची ‘कोलंबिया’ भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 5:01 AM

शिक्षणाच्या माध्यमातूनच उत्कर्षाचा मार्ग सापडतो, हे सिद्ध करून दाखविले आहे महापालिकेत सफाई कामगार ...

मुंबई : शिक्षणाच्या माध्यमातूनच उत्कर्षाचा मार्ग सापडतो, हे सिद्ध करून दाखविले आहे महापालिकेत सफाई कामगार असलेले सुनील यादव (वय ३६ वर्षे) यांनी. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्समधून पीएच.डी. करणाºया सुनील यांनी नुकताच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रबंध सादर केला. प्रबंधात त्यांनी तुच्छ वागणूक व अपमान सहन करणाºया सफाई कामगारांची व्यथा मांडली आहे.ग्रँटरोड डी विभागात यादव अनेकवेळा सफाईचे काम करतात. पण हे काम करीत असताना जिद्दीने त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी सफाईचे काम सुरूच ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या प्रबंधात त्यांनी सफाई कर्मचाºयाला जन्मापासून मिळणारी तुच्छ वागणूक, त्याला आपल्या आत्मसन्मानाशी करावी लागणारी तडजोड मांडली आहे. हा प्रबंध एक किंवा दोन महिन्यांच्या संशोधनावर नव्हे, तर माझाच जीवनपट आहे, असे यादव यांनी सांगितले.प्रबंध सादर करण्यासाठी १५ देशांतील ५० विद्वानांना बोलविण्यात आले होते. त्यापैकीच सुनील यादव एक होते. मात्र त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सहजसोपा नव्हता. व्हिसा आणि महापालिकेतून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. पण शिक्षणामुळेच आज आपल्याला ही उंची गाठता आली, असे ते अभिमानाने सांगतात. वॉशिंग्टन येथील जॉर्ज टाऊन विद्यापीठातही त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे शिक्षण घेतले त्या कोलंबिया विद्यापीठाला मी भेट दिली. मन भरून आले. ही जागा प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास देऊन गेली. एक सफाई कामगार म्हणून एवढी मोठी झेप घेईन हा विचार कधीही केला नव्हता,परंतु सतत प्रयत्न आणि शिक्षणामुळे मी यशाची उंची गाठू शकलो. - सुनील यादव