Join us

लसीकरणासाठी पालिकेकडून १३ खासगी रुग्णालयांचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:06 AM

अंतिम निर्णय प्रलंबित : पालिका प्रशासनाची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यासह मुंबईत लसीकरण प्रक्रियेला वेग येण्यासाठी खासगी ...

अंतिम निर्णय प्रलंबित : पालिका प्रशासनाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यासह मुंबईत लसीकरण प्रक्रियेला वेग येण्यासाठी खासगी रुग्णालयांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या आलेल्या प्रस्तावांचा विचार करून १३ खासगी रुग्णालयांच्या नियुक्तीचा विचार केला आहे, याविषयीचा अंतिम निर्णय प्रलंबित असून लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल.

पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, पालिका प्रशासनाच्या वतीने १३ खासगी रुग्णालयांचा लसीकरण प्रक्रियेसाठी विचार करण्यात येईल. या रुग्णालयांमध्ये मुख्यत्वे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात येईल. या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांचे लसीकरण सुरू केले जाईल. त्यामुळेच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी साठा उपलब्ध झाल्यानंतरच खासगी रुग्णालयांचा विचार करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी शासकीय-पालिका व कोविड केंद्रांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

लसीकरणाच्या मोहिमेचे विकेंद्रीकरण करायचे ठरले तर अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार अनेक पटीने अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचेल. ही प्रक्रिया सर्वांसाठी सोयीस्कर असेल व तेथे उत्तम नियंत्रणही ठेवले जाईल, तसेच चांगली सोय उपलब्ध करून दिली जाईल. लसीकरणासाठी लागणाऱ्या सीरिंजसारख्या वस्तू रुग्णालये स्वतःकडील वापरणार असल्याने लसीकरणाचा खर्चही खासगी व ट्रस्ट हॉस्पिटलच्या मदतीने विभागला जाईल. गरज वाटल्यास पालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आपल्या आवारात लसीकरण करण्याचीही रुग्णालयांची तयारी आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ हाॅस्पिटलचे अध्यक्ष डॉ. गौतम खन्ना यांनी दिली.

* १ कोटी मुंबईकरांच्या लसीकरणाचे नियाेजन

कोविड लसीकरणाची मोहीम सध्या सुरू असून लस सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार लसीकरण मोहीम राबवून मुंबईतील किमान एक कोटी नागरिकांचे कोविड लसीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. संसर्गजन्य रोग असलेल्या क्षयरोग, एड्स, आणि वेक्टर जनित रोग जसे मलेरिया, डेग्यू व लेप्टोस्पायरेसिस याकरता सन २०३० पर्यंत सर्व बालकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचे पालिकेने स्प्ष्ट केले.

....................